४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या! विद्युत डीपी चोरीचे ६ गुन्हे उघड आळंदी, चाकण व दिघी परिसरातील डीपी चोरीचा छडा
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ग्रामीण भागात विद्युत डीपी चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असताना, या गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पाहिजे आरोपीसह अन्य दोन आरोपींना अटक करून विद्युत डीपी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे ५ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
आळंदी, दिघी आणि चाकण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विद्युत डीपी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना, मरकळ आणि पिंपळगाव परिसरात डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले.
उत्तर प्रदेशातील आरोपींचा सहभाग उघड
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींची नावे समोर आली. त्यामध्ये मुरलीधर गौतम जैसवार (वय ४५), विनोद हरिराम जैसवार (वय ५०) आणि मिनिव महेंद्र प्रसाद (वय ३६), हे तिघेही उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मडियाहू परिसरातील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी आपल्या साथीदाराच्या मदतीने मरकळ, पिंपळगाव आणि सोलू परिसरात विद्युत डीपी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या चोरीतून मिळालेल्या तांब्याच्या तारा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच, गुन्ह्यांमध्ये वापरलेले साहित्य व दुचाकी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
सहा गुन्ह्यांची उकल
या कारवाईमुळे आळंदी, दिघी आणि चाकण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विद्युत डीपी चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी संबंधित यंत्रणेकडे कार्यवाही सुरू ठेवली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त सोहेल शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार आणि गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ पथकाने ही कारवाई केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी, युवराज बिराजदार, सोमनाथ बोंढाडे, बाळासाहेब खेडकर, दिलीप राठोड, स्वप्निल म्हात्रे आणि अजित रूपनवर यांचा सहभाग होता.
विद्युत डीपी चोरीमुळे शेतकरी, नागरिक आणि वीजपुरवठा यंत्रणेला होणारा त्रास लक्षात घेता, या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिसरातील अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
vishwanathkeswad