स्टार बाजारमध्ये महागड्या वस्तूंवर डल्ला; सराईत चोरीची टोळी जेरबंद चार महिला, तीन पुरुष अटकेत; इनोव्हा कारसह तब्बल ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील स्टार बाजारमध्ये महागड्या वस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत चार महिला आणि तीन पुरुष अशा सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून इनोव्हा कारसह तब्बल ७ लाख २१ हजार ९६० रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास वाकड येथील यशवंत बिल्डिंगमधील स्टार बाजारमध्ये चोरीची घटना घडली होती. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता कलाटे वस्ती येथील स्टार बाजारमध्ये तीन ते चार महिला व पुरुष ऑटो रिक्षातून आले. त्यांनी बाजारातील महागड्या वस्तूंवर डल्ला मारून तेथून पसार झाले.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली.
दरम्यान, आरोपी पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने वाकड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून चार महिला आणि तीन पुरुषांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी वाकड परिसरातील स्टार बाजारसह केसनंद फाटा, वाघोली आणि पुणे येथील स्टार बाजारमध्येही चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून काजू, बदाम, तूप पॅकिंगसह इतर महागड्या वस्तू चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून इनोव्हा कार आणि चोरीचा मुद्देमाल असा एकूण ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविकांत देवानंद जाधव (३२), विजय सिताराम मदेशिया (२९), विजय बाळू यादव (३८), सोनम बाबू शेख (३८), सलमा शकील शेख (३९), सानिया बाबूरुप शेख (२०) आणि रमा विजय मदेशिया (२९) यांचा समावेश आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर भागांत अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस सहआयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसराज तेली आणि पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे तसेच वाकड विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.
vishwanathkeswad