बनावट व्हॉट्सॲप अकाउंटचा खेळ; कंपनीला २.२० कोटींचा फटका, राजस्थानातील आरोपी अटकेत
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पिंपरी-चिंचवड,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीच्या सीईओच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या अकाउंट एक्झिक्युटिव्हचा विश्वास संपादन करून बँक खात्यातील कोट्यवधी रुपये वळविणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
१४ ऑगस्ट २०२६ रोजी कंपनीतील अकाउंट एक्झिक्युटिव्ह यांना एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून बँक अकाउंट बॅलन्सबाबत मेसेज प्राप्त झाला. संबंधित व्हॉट्सॲपच्या डीपीवर कंपनी मालकांचा फोटो आणि नाव असल्याने कर्मचाऱ्याने त्यावर विश्वास ठेवला.
यानंतर आरोपीने कंपनीच्या अकाउंटमधून २ कोटी २० लाख रुपये सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास सांगितले. त्यानुसार कंपनीची मोठी रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळविण्यात आली.
फसवणूक लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. बँक खात्यांचे व्यवहार, मोबाईल क्रमांक आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास करत पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
या प्रकरणात संचय पराग चव्हाण (वय २०, डोंबिवली ईस्ट), रमेश कुमार शंकरलालजी पुनिया (वय २८, पनवेल) आणि प्रकाश गोर्धनराम पंवार (वय २०, राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी रमेश कुमार पुनिया याला पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळवून त्यातून आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या आर्थिक व्यवहारामागील इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. बनावट व्हॉट्सॲप अकाउंटच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा आणखी किती व्यवहार उघडकीस येतो, याकडे आता पोलिसांचे लक्ष आहे.
vishwanathkeswad