गोमाता पूजन आणि सहस्र दीपोत्सवाने लखलखली श्रीमंत गायकवाड सरकार सदर! दावडीत क्षत्रिय परंपरेचा ऐतिहासिक सोहळा उत्साहात संपन्न

गोमाता पूजन आणि सहस्र दीपोत्सवाने लखलखली श्रीमंत गायकवाड सरकार सदर! दावडीत क्षत्रिय परंपरेचा ऐतिहासिक सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,

दावडी (ता. खेड) : छत्रपती शिवाजी महाराज की जय… यदुवंशभूषण सेनाखासखेल समशेर बहाद्दर बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार की जय… जय भवानी, जय शिवाजी… अशा जयघोषांनी दावडी येथील ऐतिहासिक श्रीमंत गायकवाड सरकार सदरचा परिसर दुमदुमून गेला. वसुबारसेच्या पवित्र मुहूर्तावर गोमाता पूजन आणि सहस्र दीपोत्सवाच्या मंगलमय सोहळ्याने ऐतिहासिक गायकवाड सरकार सदर हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली.

श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान कार्यक्षेत्र अखंड भारत, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान दावडी आणि समस्त ग्रामस्थ दावडी-निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सलग सातव्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्याची सुरुवात गायकवाड स्वराज्य घराण्यातील महिलांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि बडोदा संस्थानचे संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या तैलचित्रांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गायकवाड सरकार तख्ताचे विधिवत पूजन करण्यात आले. क्षत्रिय परंपरेनुसार गोमाता पूजन आणि सहस्र दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपांच्या प्रकाशाने संपूर्ण सदर परिसर भक्तिमय आणि ऐतिहासिक वातावरणाने भारावून गेला.

दावडी हे गायकवाड स्वराज्य घराण्याचे मूळ गाव

खेड तालुक्यातील दावडी हे गाव शिवकालीन इतिहासात पराक्रम गाजवलेल्या गायकवाड स्वराज्य घराण्याचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. याच भूमीतून गायकवाड घराण्याच्या वैभवशाली इतिहासाचा विस्तार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत आणि विस्तारात गायकवाड घराण्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे गुजरातमधील बडोदा संस्थानावर गायकवाड घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित केली आणि घराण्याचे थोरले घराणे बडोदा नरेश म्हणून स्थिरावले.

दावडी गावात गायकवाड घराण्याचा अंदाजे ७०० वर्षांपूर्वीचा भुईकोट किल्ला असून, किल्ल्यातील गायकवाड सरकार वाड्यात आजही घराण्याचे ऐतिहासिक गादी-तख्त जतन करण्यात आले आहे. याच ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सोहळ्याच्या माध्यमातून केला जात आहे.

 इतिहास संशोधनातून घराण्याची नाळ पुन्हा जोडली!

गायकवाड स्वराज्य घराण्याचा विस्तार देशभर आणि विविध भागांत झाला असला, तरी अनेक सदस्य आपल्या मूळ गावापासून आणि घराण्याच्या संपूर्ण इतिहासापासून दूर होते. श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे सचिव आणि वंशवेलकार इतिहास संशोधक प्रवीणभय्या दत्ताजी गायकवाड यांनी स्वसंशोधनातून घराण्याचा गौरवशाली इतिहास सप्रमाण संकलित करून तो विविध ठिकाणी विखुरलेल्या गायकवाड घराण्यातील सदस्यांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे घराण्यातील सदस्यांना आपल्या मूळ गावाशी पुन्हा जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडले.

ऐतिहासिक परंपरेला उजाळा देण्याचा संकल्प

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित सुरेशराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. १९ फेब्रुवारी २०१५ रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात गायकवाड स्वराज्य घराण्याचा रथ सहभागी करण्यात आला. त्यातून देशभरातील गायकवाड घराण्यातील सदस्यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली.

त्यानंतर १४ जानेवारी २०२० रोजी पानिपत शौर्य दिनानिमित्त सदरेचा जीर्णोद्धार करून पानिपत वीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांना मानवंदना देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याच वर्षी वसुबारसेच्या दिवशी गोमाता पूजन आणि सहस्र दीपोत्सवाची परंपरा सुरू करण्यात आली. आज हा सोहळा गायकवाड घराण्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

 महाराष्ट्रातून गायकवाड घराण्याचे वंशज एकत्र

या सोहळ्यासाठी पुणे, चांदखेड, कुरुळी, सांगली, सोलापूर, कवठेमहांकाळ, केज (जि. बीड), पंढरपूर, कटगुण आणि तरडगाव (जि. सातारा) यांसह महाराष्ट्रातील विविध भागांतून गायकवाड स्वराज्य घराण्याचे वंशज आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिव प्रवीणभय्या गायकवाड, उपाध्यक्ष अशोकआबा गायकवाड, विलासराव गायकवाड, बाबासाहेब दिघे, सुरेशआप्पा डुंबरे, रवी गायकवाड, ओंकार गायकवाड, विशाल गायकवाड, आदित्य गायकवाड, ईशान गायकवाड, नितीन गायकवाड, प्रताप गायकवाड यांच्यासह दावडी-निमगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.