कळस मधील चार युवकांनी केले घरोघरी जाऊन भाजीपाला वाटप,अनोख्या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून स्वागत..
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले : महाभयंकर असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाला थांबविण्यासाठी घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाला कळस मधील सर्व ग्रामस्थांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कळस मध्ये भरणारी भाजी मंडई या पूर्णपणे बंद झाली.
गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची चणचण भासत आहे. यासाठी गावातील चार तरुणांनी आपणही एक समाजाचे देणे लागतो या युक्तीतून राष्ट्रवादी युवकचे प्रभात चौधरी, युनिटी सोशल मीडियाचे अध्यक्ष नकुल ढगे, राहुल चव्हाण, सुमित भुसारी या युवकांनी एकत्र येत संकल्पनेतून मोफत भाजीपाला वितरित केला.
यावेळी या ठिकाणी तरुणांकडून ग्रामस्थांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हात साबणाने धुवावेत, गर्दीत जाणे टाळावे, हस्तांदोलन करणे टाळावे आदी प्रकारचे खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले. या सर्व तरुण युवकांकडून ग्रामस्थांना स्वच्छतेचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले. अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम या युवकांकडून वेळोवेळी राबवण्यात येत असतो.
कळस ग्रामस्थांच्या वतीने या चारही तरुणांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपक्रमास आ.डॉ.किरण लहामटे यांचे विश्वासू सहकारी प्रभात चौधरी, दौलत वाकचौरे, माऊली उद्योग समूहाचे संकेत गवळी व ग्रामस्थ विकास शिर्के यांनी या तरुणांना मोलाचे सहकार्य केले.
अशा युवकांचा समाजाला नक्कीच अभिमान असला पाहिजे असाच उपक्रम जर प्रत्येक गावातील युवकांनी राबविला तर कोरोना विषाणूचा लवकरच नायनाट होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कळस बु ग्रामपंचायतचे सदस्य ईश्वर वाकचौरे यांनी व्यक्त केले. त्यांनी चारही युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली तसेच कोणतेही सहकार्य लागले तर मला सांगा मी नक्कीच सहकार्य करण्यास तयार आहे असे सांगितले.