चाकणमध्ये बसचालकाला अडवून बेदम मारहाण! शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना चाकण दक्षिण पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
चाकण : प्रतिनिधी विश्वनाथ केसवड
चाकणमध्ये एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसचालकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बससमोर दुचाकी आडवी लावून चालकाला बसमध्येच मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, चाकण दक्षिण पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.
मुटकेवाडी सिग्नल चौकात थरार!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत पांडुरंग गवई (वय ४३, रा. नाशिक) हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसवर चालक म्हणून कार्यरत आहेत. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ते MH 06 ES 1364 क्रमांकाची शिवनेरी बस स्वारगेटहून नाशिकच्या दिशेने घेऊन जात होते.
यावेळी चाकण येथील मुटकेवाडी सिग्नल चौकात आरोपींनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल बससमोर आडवी लावून बसचा मार्ग अडवला. त्यानंतर बसमध्ये प्रवेश करून चालकाला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केला.
दोघांना पोलिसांनी केली अटक
या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी करण मारुती गायकवाड (वय २३) आणि कार्तिक मारुती गायकवाड (वय २०), दोघेही रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे, यांना अटक केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कारवाई
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रंजणकर (चाकण विभाग) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
चाकण दक्षिण पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोते तसेच पोलीस अंमलदार राहुल मिसाळ, ख्वाजा शेख, विशाल बंड आणि प्रियांका गिरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
vishwanathkeswad