आसामला पळून जाण्याचा डाव पोलिसांनी उधळला! प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; चाकण पोलिसांची अवघ्या ४ तासांत धडाकेबाज कारवाई!
चाकण | प्रतिनिधी विश्वनाथ केसवड
प्रेमसंबंधातील वादातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे घडली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढत थेट आसामला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाकण दक्षिण पोलिसांच्या डी.बी. पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत अवघ्या चार तासांत पुणे रेल्वे स्टेशनवरून त्याला बेड्या ठोकल्या.
१६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास मेदनकरवाडी येथील गवती वस्ती परिसरातील खोलीमध्ये एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिसरातील कामगारांकडे चौकशी केली असता जखमी तरुणाचे नाव अमिनुल इस्लाम असल्याचे समोर आले. तर त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव शाहीदीन इस्लाम शेख असल्याची माहिती मिळाली.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा माग!
आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी पुणे शहराच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मूळचा आसाम राज्यातील असल्याने तो परराज्यात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अखेर पुणे रेल्वे स्टेशनवरून आसामला जाण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेण्यात आले.
प्रेमसंबंधातील वादातून हल्ला केल्याचा संशय!
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जखमी अमिनुल इस्लाम याच्या पत्नीसोबत आरोपीचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच रागातून आरोपीने अमिनुल इस्लाम याच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त मा. विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त मा. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आहाड, अपर पोलीस आयुक्त मा. बसवराज तेली, सह-पोलीस आयुक्त मा. योगेश रंजणकर तसेच चाकण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सोमनाथ जाधव, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे तसेच पोलीस अंमलदार शिवाजी चव्हाण, सुनील भागवत, रेवणनाथ खेडकर, मिसाळ, ख्वाजा शेख आणि विशाल बंड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अवघ्या चार तासांत आरोपीला जेरबंद करत चाकण पोलिसांनी परराज्यात पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.
vishwanathkeswad