ओडिशातून गांजाची तस्करी २३५ किलो गांजासह १ कोटी ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त महिंद्रा XUV 700 मधून सुरू होती गांजाची वाहतूक; शिरूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना घेतले ताब्यात!

ओडिशातून गांजाची तस्करी २३५ किलो गांजासह १ कोटी ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त महिंद्रा XUV 700 मधून सुरू होती गांजाची वाहतूक; शिरूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना घेतले ताब्यात!

शिरूर | प्रतिनिधी विश्वनाथ केसवड,

पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिरूर पोलीस ठाणे आणि पुणे शहर अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना जेरबंद केले आहे. आरोपींकडून तब्बल २३५ किलो ३९० ग्रॅम गांजा, एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 700 कार आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ओडिशातून गांजा आणल्याची माहिती; पोलिसांनी रचला सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री शिरूर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना दि. २६ नोव्हेंबर रोजी पहाटे पुणे शहर अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जीवन माने यांना एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा XUV 700 कारमधून काही इसम ओडिशा राज्यातून गांजा घेऊन हैदराबाद-सोलापूर मार्गे पुणे शहराकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

सदर कार पुणे-सोलापूर महामार्गावरून दौंडच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दौंड पोलिसांना कारची माहिती देऊन नाकाबंदी करण्यास सांगितले. मात्र, संबंधित कार पोलिसांना हुलकावणी देऊन काटेमार्गे शिरूरकडे जात असल्याचे समजताच त्यांनी शिरूर पोलिसांना माहिती दिली.

पहाटे तीन वाजता थरारक पाठलाग; दोघे पोलिसांच्या जाळ्यात

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर यांनी पथकासह हिवरा जंक्शन, पुणे-नगर रोड, गोलेगाव रोडवरील सुंदर सृष्टी अपार्टमेंटजवळ अशा तीन ठिकाणी तात्काळ नाकाबंदी केली.

दि. २६ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संशयित महिंद्रा XUV 700 कार भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता शिरूर शहराच्या दिशेने पळ काढला.

शिरूर पोलिसांनी शासकीय वाहनाने पाठलाग सुरू केला. अखेर पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक कॉलनीतील सत्यभामा निवास बिल्डिंगसमोरील मोकळ्या जागेत कारसह दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

 कारच्या डिक्कीत गांजाचे १२८ गट्टे

घटनास्थळी पुणे शहर अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद पाटील दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या परवानगीने व पंचांच्या समक्ष कारची झडती घेण्यात आली.

कारच्या डिक्कीमध्ये खाकी चिकटपट्टीने गुंडाळलेले १२८ गट्टे आढळून आले. त्यामध्ये उग्र वासाचा गांजा मिळून आला. तसेच आरोपींकडून २२ गोण्यांमध्ये भरलेला एकूण २३५ किलो ३९० ग्रॅम वजनाचा हिरवट-तपकिरी रंगाचा गांजा जप्त करण्यात आला.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1) अजय जगदीश मोहिते (वय ३० वर्षे), व्यवसाय – फर्निचर वर्क, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती.

2) समीर पुरुषोत्तम राजूत (वय २४ वर्षे), व्यवसाय – पॉवर ब्लॉक ऑपरेटर, रा. मु. पो. सांगोलवाडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती.

१ कोटी ५२ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे.

* २३५ किलो ३९० ग्रॅम गांजा.

* पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 700 कार (MH-27-DL-6284).

* दोन मोबाईल फोन.

असा एकूण १ कोटी ५२ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस अंमलदार अर्जुन साहेबराव भालसिंग यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(क), २२(क), २५, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये गांजा पुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू असलेली तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. या गांजाचा पुढील पुरवठा कुठे होणार होता, या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत आणि या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा सखोल तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, अमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक ०२ (पुणे शहर) चे पोलीस निरीक्षक जीवन माने, सपोनि अफरोज पठाण, सपोनि नितीनकुमार नाईक, शिरूर पोलीस ठाण्याचे सपोनि केणेकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खंडिंग, पोलीस अंमलदार अर्जुन भालसिंग, बालाजी मोटे, राजू मांजरे, पालवे, रतन भोसले, दीपक फुंदे तसेच अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.