चाकण नगरपरिषदेची धडक मोहीम; २०० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
चाकण नगरपरिषदेच्या वतीने आज, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालय ते मार्केट परिसरात नियुक्त पथकामार्फत धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान भाजी विक्रेते, फळ विक्रेते, स्ट्रीट फूड स्टॉल, विविध दुकाने, हॉटेल्स, कपड्यांची दुकाने, मिठाई शॉप तसेच मार्केट परिसरातील विविध आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले. आजच्या कारवाईत तब्बल २०० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.
नगरपरिषदेच्या पथकाने संबंधित व्यावसायिक व विक्रेत्यांना बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत तसेच त्याऐवजी पर्यायी वस्तूंचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
दरम्यान, पुढील टप्प्यात तपासणीदरम्यान पुन्हा बंदी असलेले प्लास्टिक आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चाकण शहरातील प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्येही नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण होत आहे.
vishwanathkeswad