चाकणमध्ये हँडल लॉक असलेली दुचाकीही सुरक्षित नाही! सोसायटीच्या पार्किंगमधून गाडीची चोरी
चाकण | प्रतिनिधी विश्वनाथ केसवड,
चाकण शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमुळे वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहन हँडल लॉक करून सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभे केलेले असतानाही चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना चाकणमधील एकतानगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ बाळू घुले (वय ४०) यांनी आपली बजाज प्लॅटिना मोटारसायकल एकतानगर येथील मिना रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. काळ्या रंगाची आणि सिल्व्हर पट्टे असलेली MH14 FV 1160 क्रमांकाची ही मोटारसायकल त्यांनी हँडल लॉक करून ठेवली होती.
मात्र, अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून ही दुचाकी चोरून नेली. चोरीला गेलेल्या मोटारसायकलची अंदाजित किंमत २५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर नवनाथ घुले यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६६/२०२६ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हँडल लॉक करूनही दुचाकी चोरीला जात असल्याने सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंग परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षाव्यवस्थेकडे वाहनधारकांनी लक्ष देण्याची गरज आहे. या चोरीचा तपास करून दुचाकी चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
vishwanathkeswad