पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांना ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे; वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे होणार रेकॉर्डिंग; नागरिक आणि पोलिसांमधील वादांना बसणार आळा,
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :विश्वनाथ केसवड
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी वाहतूक विभागाला तब्बल ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचे रेकॉर्डिंग होणार असून, पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना पोलीस कर्मचारी आणि नागरिक यांच्यात अनेकदा वाद निर्माण होतात. काही वेळा कारवाईबाबत गैरसमज, चुकीची वागणूक किंवा गैरव्यवहाराच्या तक्रारीही समोर येतात. अशा घटनांमध्ये आता बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डिंग महत्त्वाचा पुरावा ठरू शकणार आहे.
या कॅमेऱ्यांमुळे वाहतूक पोलिसांकडून केली जाणारी कारवाई, वाहनचालकांशी होणारा संवाद आणि घटनास्थळावरील परिस्थिती रेकॉर्ड करता येणार आहे. त्यामुळे कारवाईबाबत तक्रार दाखल झाल्यास उपलब्ध रेकॉर्डिंगच्या आधारे वस्तुस्थिती तपासण्यास मदत होईल.
विशेष म्हणजे, या व्यवस्थेमुळे केवळ वाहनचालकांवरच नव्हे, तर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही देखरेख राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच पोलीस कर्मचाऱ्यांनीही नियमांचे पालन करणे अपेक्षित राहणार आहे.
नागरिकांसाठी दिलासादायक पाऊल!
३५० बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांच्या वापरामुळे वाहतूक कारवाईत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्येक कारवाईवेळी कॅमेरे सुरू ठेवणे, रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवणे आणि तक्रारीच्या वेळी फुटेज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था प्रभावीपणे राबवणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांची कारवाई कॅमेऱ्यात कैद होणारच; पण कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वर्तनही कॅमेऱ्याच्या नजरेत राहणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक व्यवस्थेत हा बदल कितपत प्रभावी ठरतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
vishwanathkeswad