दिवेआगर दुर्घटनेनंतर विनर्स अकादमी सील; आळंदी नगरपरिषदेची मोठी कारवाई
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड आळंदी,
आळंदी : दिवेआगर येथे सहलीदरम्यान झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आळंदी नगरपरिषद प्रशासनाने शहरातील कोचिंग क्लासेस व शैक्षणिक आस्थापनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जात असून, आळंदीतील विनर्स अकादमीवर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करत संबंधित मिळकत सील केली आहे.
नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र. जुना ११३७, नवीन LAN00001729 या ठिकाणी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे आढळून आले.
तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनेकडे नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना अथवा ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर लागू कायदे व नियमांनुसार पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार नगरपरिषद प्रशासनाने संबंधित मिळकत सील करण्याची कारवाई केली.
दिवेआगर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक सहली, कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित नियमांची अंमलबजावणी कितपत केली जाते, याबाबत प्रशासनाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील इतर क्लासेस व शैक्षणिक आस्थापनांमध्येही आवश्यक परवाने, NOC आणि सुरक्षा नियमांची पूर्तता आहे का, याकडे आता प्रशासनाचे लक्ष आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शैक्षणिक संस्था आणि क्लासेसनी आवश्यक प्रशासकीय परवानग्या तसेच सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
vishwanathkeswad