मोठी बातमी : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एकाचा चाकण येथील महिलेवर बलात्कार, गुन्हे शाखा युनिट -३ कडून आरोपीला २४ तासाच्या आत बेड्या...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : मेदणकरवाडी गावाच्या हद्दीतील मुटकेवाडी येथील भुरूक कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील भागात एका २७ वर्षीय महिलेवर रात्रपाळीवर जाताना एका अनोळखी व्यक्तीकडून बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, १३ मे रोजी रात्री ११:१५ ते ११:४५ वाजताच्या सुमारास, मौजे मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील मुटकेवाडी, ता. खेड, जि. पुणे येथील भुरुक कॉम्प्लेक्स च्या पाठीमागे एक २७ वर्षीय महिला रात्रपाळीतील कामासाठी कंपनीत जात असताना, अज्ञात इसमाने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाकण औद्योगिक परिसरात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर घटनेबाबत चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांच्या मदतीने विशेष ६ पथके तयार करण्यात आली. हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तपासून तांत्रिक विश्लेषकाचे सहकार्य घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती देण्यात आली. सखोल तपासा दरम्यान आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे (सध्या रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. अकोले, जि. अहिल्यानगर) याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यास चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यास विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखा युनिट-३ च्या टीमने आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपीला घटनेनंतर अवघ्या २४ तासाच्या आत अटक केली. गुन्हे शाखा युनिट-३ च्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात महिला अत्याचार संदर्भातील गंभीर गुन्ह्याचे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.