मोठी बातमी : खेड तालुक्यात खंडणीसाठी हॉटेलमालकावर गोळीबाराच्या घटनेने खळबळ..!

News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील एसईझेडमधील गोसासी (ता. खेड) येथे हॉटेलमालक नीलेश गोरडे यांच्याकडे गुंडांनी शनिवारी मध्यरात्री खंडणीची मागणी केली. खंडणीस नकार दिल्याने गोरडे यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर बेदम मारहाण केली आणि हॉटेलमध्ये राडा केला. याप्रकरणी नऊ जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकरा वाजता कनेरसर व गोसासी परिसरातील मयूर तानाजी हजारे, अक्षय बबन हजारे, मंगेश दौंडकर, गणेश दिलीप गोरडे, बंटी डफळ व इतर चार अनोळखी तरुणांनी गोसासी गावच्या हद्दीतील हॉटेल दुर्वांकुर येथे जेवण केले. त्यांच्याकडे हॉटेल मालकाने बिलाची मागणी केली असता अक्षय हजारे याने कमरेचा पट्टा काढला आणि बिल मागितले तर या बेल्टने तुला मारेल, अशी धमकी हॉटेलमालक नीलेश गोरडे यांना दिली.
थोड्या वेळाने रात्री साडेबारा वाजता पुन्हा हे टोळके मृण्मयी इंटरप्रायजेस या ऑफिससमोर आणि हॉटेल दुर्वांकुरच्या समोर आले. त्यांनी हॉटेलमालक नीलेश याचा भाऊ संदेश गोरडे, चुलतभाऊ उमेश गोरडे, शशिकांत गोरडे व अक्षय गोरडे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांतील मयूर हजारे व अक्षय हजारे हे संदेश यास म्हणाले, "तुझ्या हॉटेलचा धंदा चांगला होतो. तू आम्हाला हफ्ता चालू कर, नाहीतर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही." त्यांनी खंडणीची मागणी केल्यावर संदेशने त्यास नकार दिला.
चिडून मयूर हजारे याने त्याच्या हातातील पिस्तूल संदेश याच्यावर रोखला आणि पिस्तुलातून दोनदा गोळी झाडली. संदेशने गोळ्या चुकविल्या. त्यानंतर या नऊ जणांच्या टोळक्याने संदेश याला जखमी केले.
या प्रकरणी खेड पोलिसांनी नऊ जणांविरोधात खंडणी, दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.