BIG BREAKING : खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे गावात मोबाईल फोडल्याच्या कारणावरून परप्रांतीय युवकाचा खून..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : महाळुंगे इंगळे गावात पुन्हा एकदा एका परप्रांतीय युवकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. मागील दहा दिवसातील ही महाळुंगे गावातील खुणाची दुसरी घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन फोडल्याच्या शुल्लक कारणावरून दोन परप्रांतीयांमध्ये झालेल्या वादातून तेवीस वर्षीय युवकाचा गळा आवळून आणि डोक्यात लोखंडी तवा मारुन खून केल्याची घटना महाळुंगे इंगळे (ता.खेड ) येथे (दि.२९ ) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.
कालू मंगल रकेवार (वय.२३ वर्ष,सध्या रा.महाळुंगे,मुळ रा.पथरीया, ता.जि.दमुही, राज्य मध्यप्रदेश ) असे खून करण्यात आलेल्या युवकाचा नाव आहे. याप्रकरणी पप्पू मंगल रकवार ( वय. ४० वर्ष,सध्या रा.महाळुंगे,ता.खेड,जि.पुणे,मूळ रा.पथरीया,ता.जि. दमूही,राज्य मध्यप्रदेश ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामसिंग ( वय ३० वर्ष, रा. रेवाना ता.जि.दमुही राज्य मध्यप्रदेश ) याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पू, कालू आणि राम सिंग हे तिघे परप्रांतीय चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत ठेकेदारीवर काम करत असून एकाच भाड्याच्या खोलीत महाळुंगे इंगळे येथे एकत्र राहत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी कालू याने राम सिंग याचा मोबाईल फोडला होता. यावरून दोघांमध्ये (दि.२८ ) ला जोरजोराने भांडणे सुरू होती. पप्पू हा खोलीवर रात्री दहाच्या सुमारास गेला असता कालू रकेवार हा खाली जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या छातीवर रामसिंग बसून कालूच्या गळ्याभोवती गुलाबी रंगाचा फेट्याचा कपड्याने डाव्या हाताने गळा दाबत होता आणि उजव्या हातातील लोखंडी तव्या मारत होता. या मारहाणीत कालूच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेतील फरारी आरोपी रामसिंग याचा शोध घेण्यासाठी महाळुंगे MIDC पोलीसांची पथके रवाना झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) संतोष कजबे व सहकारी पोलीस अंमलदार करत आहेत.