मोठी बातमी : भामा आसखेड बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या सोळा वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू...

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण ( पुणे ) : भामा आसखेड धरणाच्या बंधाऱ्यातील पाण्यात उतरलेल्या सोळा वर्षीय युवकाचा दमछाक झाल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ( दि.१) रोजी सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आदित्य नानासाहेब पिसाळ (वय-१६ वर्षे,प्राधिकरण, आकुर्डी, पुणे) असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,आदित्य हा आपल्या सोबतच्या पाच मित्रांसह भामा आसखेड धरणावर फिरायला आला होता. उन्हाचा कडाका असल्याने सर्व जण धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना दम लागल्याने आदित्य हा पाण्यात बुडाला.ही माहिती आसखेड गावचे पोलीस पाटील नितीन बापू गाडे आणि ग्रामस्थांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नानंतर आदित्यला पाण्याबाहेर काढले. परंतु तोपर्यंत त्याचा दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत.