मोठी बातमी : राजगुरूनगर शहरातील अल्पवयीन मुलीवर पिंपरी-चिंचवड शहरात बलात्कार, तिघांना पोलिसांकडून अटक...!

मोठी बातमी : राजगुरूनगर शहरातील अल्पवयीन मुलीवर पिंपरी-चिंचवड शहरात बलात्कार, तिघांना पोलिसांकडून अटक...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

खेड(राजगुरुनगर) : पिंपरी-चिंचवड शहरात राजगुरूनगर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार रावेत परिसरात उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी, तिची मैत्रीण आणि आरोपी हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी मद्यप्राशन केल्यावर हा प्रकार मंगळवारी (दि. २१) रोजी मध्यरात्री ते पहाटे घडला आहे.

आयुष आनंद भोईटे (वय २० रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), सुशील बालन्द्र ठाकूर (वय २२ रा. बापदेवनगर, देहूरोड), रितिक संजय सिंग (वय २५, रा. बापदेवनगर, देहूरोड) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोईटे याने सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. यावेळी पीडित मुलीची एक रीलस्टार मैत्रीणही फ्लॅटमध्ये उपस्थित होती. 

मिळालेल्या माहितीवरून, सतरा वर्षीय पीडित मुलगी मूळची राजगुरुनगर,खेड येथील आहे. हि मुलगी नीट (एनईईटी) परीक्षेची तयारी करण्याकरिता पिंपरी शहरात संत तुकारामनगर परिसरात एकटीच भाडेतत्त्वावर राहते. पाच वर्षांपूर्वी तिची पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका रीलस्टार मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. रीलस्टार मुलीचे आईशी पटत नसल्याने ती पीडित मुलीच्या हॉस्टेलवर एक दिवस राहण्यासाठी आली होती. विशेष म्हणजे या दोघी मागील पाच वर्षांत कधीच एकमेकींना भेटलेल्या नव्हत्या. रीलस्टार मुलगी पीडित मुलीच्या हॉस्टेलवर आल्यानंतर तिने आपल्या आईला फोन करून मी संत तुकारामनगर येथे आली आहे. दुसऱ्या दिवशी माझे शूटिंग उरकले की मी घरी येईन, असे सांगितले होते. याच दरम्यान इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच आरोपी भोईटे याच्याबरोबर काही वर्षांपूर्वी रीलस्टार मुलीची ओळख झाली होती. पीडित मुलीला रिलिस्टार मैत्रिणीने मी मित्राकडे जाऊन येते, असे सांगून संबंधित रीलस्टार रावेत येथे गेली. तेव्हा भोईटे आणि संबंधित रीलस्टारने मद्यप्राशन केले. मध्यरात्रीपर्यंत ही मैत्रीण परत न आल्याने पीडितेने तिला फोन करून हॉस्टेलवर कधी येणार याची अनेक वेळा विचारणा केली. मात्र शेवटी केलेला फोन आरोपी भोईटे यांनी घेतला तसेच रीलस्टार झोपली आहे. थोड्या वेळाने ती येणार आहे. तुला पार्टीसाठी यायचे असल्यास ये म्हणून सांगितले. याच दरम्यान आरोपी संजय आणि रितिक हे पार्टी करण्याकरिता भोईटे याच्या फ्लॅटवर गेले.

पीडित मुलीला आणायला हे दोघे रावेत येथून संत तुकारामनगर येथे आले. त्यानंतर पीडितेने पाठवलेल्या लोकेशनवर जाऊन संजय आणि रितिक या दोघांनी पीडितेला कारमध्ये बसवून रावेत येथे आणले. रावेत इथे आल्यानंतर आरोपी भोईटे आणि रीलस्टारने आधीच मद्यप्राशन केल्याचे तिच्या लक्षात आले. काही वेळानंतर पीडित, रीलस्टार आणि आरोपींनी पुन्हा मद्यप्राशन केले. सर्वांनी मद्य प्राशन केल्यानंतर 'टूथ अँड डेअर' खेळाला सुरुवात केली.

याच दरम्यान आरोपी भोईटे याने प्रथम रीलस्टारबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याने पीडित मुलीला फ्लॅटमधील एका स्वच्छतागृहात जाऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडत असताना पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या एका नातेवाईकाला फोन लागला. फोन सुरू असल्याचे पीडितेला आणि आरोपीला लक्षात आले नाही. संबंधित नातेवाईकाने हा प्रकार पीडित मुलीच्या आई-वडिलांना कळवला. दरम्यान हा प्रकार घडण्यापूर्वी दारूच्या नशेत असलेल्या या मुलीने आई-वडिलांनाही फोन केले होते. मात्र नातेवाईकाने धक्कादायक माहिती सांगितल्यावर पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पिंपरी-चिंचवडमध्ये धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत मुलीकडे चौकशी केल्यानंतर हे कुटुंब थेट पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आरोपी संजय आणि रितिक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांच्या माहितीवरून आरोपी भोईटे याला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक आणि दुर्दैवी बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपी भोईटे याचे पूर्ण नाव, त्याचा फ्लॅट नेमका कुठे आहे, रात्री कुठे गेलो होतो याबाबत काहीच माहिती नव्हते. 

मात्र पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारावर सर्व आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत. त्यानंतर भोईटे कुठे आहे त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्याच बरोबर संबंधित रील स्टार मुलीला ही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. या सर्व प्रकारानंतर रात्री उशिरा तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. याबाबत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वयी रावेत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे हे करत आहेत.