तुळजाभवानी मातेचे त्रिशूळ, मोत्याचे दागिने व चांदीच्या मुकुटासह प्रभावळ गायब.! मंदिर संस्थानकडून पोलिसांत तक्रार...
अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत तुळजाभवानी मातेचा चांदीच्या मुकुटासह प्रभावळ, त्रिशूळ तसेच मोत्याचे दागिने गायब असल्याची तक्रार, मंदिर संस्थानच्यावतीने पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
तर या तक्रारीत म्हटले आहे. यात काही सोन्याच्या तुकडय़ांचाही समावेश आहे. तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान दागदागिन्यांच्या चोरी प्रकरणात जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसीलदार सोमनाथ माळी यांना नेमण्यात आले. माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चार महंत, धार्मिक व्यवस्थापक, सेवेदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सोमनाथ माळी यांनी दिलेल्या तक्रारीत सात क्रमांकाच्या डब्यातील रेशमासह असलेला चांदीचा मुकुट गायब असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता. एक ते सात क्रमांकाच्या डब्यातील 17 अलंकार गायब झाले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार महंतांपैकी तीन मृत असून, महंत चिलोजीबुवा हे एकमेव सध्या हयात आहेत. धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले हे देखील हयात नाहीत. तक्रारीत केवळ 'पलंगे' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नेमके पलंगे कोण, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
तुळजाभवानीच्या दागिने चोरी प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, नेमके त्याच वेळी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या तयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या बैठकीला दागिने चोरीचा आरोप असलेले महंत चिलोजीबुवा देखील उपस्थित होते.
गायब झालेला दागिना..! एक नंबरच्या डब्यातून जडावी मोत्यासह मंगळसूत्र, जडावी मोत्यासह कानजोड, मोत्यासह छत्रजडावी, छोटा माणिक, नेत्रजोड तर दोन क्रमांकाच्या डब्यातून सहा माणिक जडवलेली नेत्रजडावी, तिसऱ्या डब्यातून मंगळसूत्र वाटीतील माणिक, माणिक असलेली नेत्रजडावी, चौथ्या डब्यातून चांदीचे खडाव, पाचव्या डब्यातूनही चांदीचे खडावजोड, सहाव्या डब्यातून मोत्याची नथ, बारा पदर, अकरा पदर पुतळय़ाची माळ, सोन्याचे मंगळसूत्र, सातव्या डब्यातून चांदीचे शेवंतीचे फूल, सहा मोती, सोन्याचे तुकडे, सोन्याची जडावी असलेली तानवटे, हिरवे पाचू असलेला माचपट्टा आणि चांदीचा मुकुट.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत अलंकार व दागिने गायब प्रकरणी दोषीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी करीत प्रश्न उपस्थितीत केला होता त्यावर उपसभापती डॉ नीलम गोहे यांनी शासनाचे याकडे लक्ष वेधले, जिल्हाधिकारी यांनी आदेश, तक्रार देऊनही गुन्हा नोंद होत झाला नसल्याचे सांगितले तसेच हिवाळी अधिवेशन संपण्यापुर्वी गुन्हे नोंद करण्याचे शासनास सांगितले. उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या 16 सदस्य असलेल्या चौकशी समितीने केलेल्या तपासणीत चांदीचा मुकुट, त्रिशूल, प्रभावळ, धुपारती यासह अनेक चांदीच्या व सोन्याच्या वस्तू गायब असल्याचे समोर आले होते.
गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्याची मोजतात झाली नव्हती, ती मोजतात जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश दिले व त्यानंतर त्या मोजदादीमध्ये अनेक मौल्यवान अलंकार सोने-चांदीच्या वस्तू गहाळ असल्याचं समोर आले आहे. या गहाळ वस्तूची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले होते त्याप्रमाणे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.