खेड तालुक्यात थरारक खून प्रकरण.! बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, खेड
खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत एका ३३ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.
मूळ आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील धनंजय मारुती घेवडे (वय ३३, सध्या रा. राक्षेवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, बुधवारी (दि. १८) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय घेवडे हा १६ मार्च रोजी रात्री ९ वाजल्यापासून बेपत्ता होता. कुटुंबीयांकडून शोध सुरू असतानाच जैदवाडी परिसरात त्याचा मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून डोक्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने गंभीर वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनास्थळी सुकलेल्या रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. विशेष म्हणजे, मृतदेहाजवळ त्याची दुचाकीही आढळून आली आहे. या सर्व परिस्थितीवरून हा खून अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूरपणे करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र, अद्याप आरोपी कोण आहे आणि खुनामागील नेमके कारण काय, हे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.