धक्कादायक घटना.! बायको माहेरी गेल्यानं, निर्दयी बापाने ३ वर्षाच्या बाळाला विकलं, ५ जणांना अटक

NEWS15 मराठी रिपोर्ट - यवतमाळ
नवरा बायकोचा वाद (भांडण) असो किंवा एकमेकांवरील प्रेम हे कधी कोणत्या टोकाला जाईल ह्याच काही नेम नाही.! बायको रूसल्याने किंवा रागावल्याने आत्तापर्यंत बायकोला मनवण्यासाठी बायकोप्रेमी नवऱ्याने अनेक घटना किंवा प्रकार केल्याचे आपण ऐकले आहे किंबहूना पहिले देखील असेल. परंतु, यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपली बायको माहेरी निघून गेल्याचा राग मनात धरत एका दारुड्या नवऱ्याने आपल्याच ३ वर्षाच्या बाळालाच तेलंगणात विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावात ही घटना घडली आहे. तर याप्रकरणी आर्णी पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल केला असून, तेलंगणा येथून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रावण देवकर, चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या गोडबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेची फिर्याद पुष्पा देवकर यांनी आर्णी पोलिसांत दिलीय.
पोलीस सुत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा श्रावण देवकर (वय २७) ह्या आर्णी तालुक्यातील कोपरा येथील रहिवासी आहे. पतीसोबत काहीकारणास्तव किरकोळ वाद झाल्याने ३ दिवसांपूर्वी त्या वर्धा येथे माहेरी निघून गेल्या. गुरुवारी (४ जानेवारी) पुष्पा देवकर परत पतीच्या घरी आल्या. यावेळी त्यांना आपले बाळ दिसून आले नाही. दिवसभर ती बाळाचा शोधाशोध घेत राहिली. अखेर रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास आपल्या बाळाला पतीनेच विकले असल्याची माहिती फिर्यादी महिलेला मिळाली. यानंतर संबंधित महिलेने तत्काळ आर्णी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत; त्यांनी तत्काळ आपले पथक पाठवून तिच्या पतीला पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने ३ वर्षीय बाळाला तेलंगणात विकल्याची कबूली दिली.
यानंतर पोलिसांनी तातडीने तेलंगणा येथील निर्मल गाव गाठून बाळाची सुटका केली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.