९५ हजारांची लाच घेतल्यानंतर एसीबीची चाहूल; शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार रकमेसह फरार

९५ हजारांची लाच घेतल्यानंतर एसीबीची चाहूल; शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार रकमेसह फरार

विशेष प्रतिनिधी शिरूर 

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश नाथाराव मुंढे हा पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला. मात्र, लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच मुंढे हा ९५ हजार रुपयांच्या रकमेसह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार सतीश मुंढे याच्याकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणात अटक न करण्यासाठी मुंढे याने सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३० सप्टेंबर रोजी पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्याची तयारी करण्यात आली.

त्यानंतर हवालदार मुंढे याने तक्रारदाराला टाकळी हाजी पोलीस चौकीत बोलावले. यावेळी तडजोडीनंतर त्याने एक लाख रुपयांऐवजी ९५ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे एसीबीच्या कारवाईत समोर आले.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ९५ हजार रुपये मुंढे याच्याकडे दिले. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच मुंढे हा लाचेच्या रकमेसह घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, फरार हवालदाराचा शोध घेण्यासाठी एसीबीचे पथक प्रयत्न करत आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाकडून फरार हवालदार सतीश मुंढे याचा शोध सुरू आहे.

लाच स्वीकारली, एसीबीची चाहूल लागली आणि हवालदार ९५ हजारांसह पसार झाला; आता फरार हवालदाराला एसीबी कधी ताब्यात घेणार, याकडे लक्ष लागले आहे.