खेड तालुक्यातील वाडा येथे ज्वेलर्स दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना अटक; १० गुन्हे उघडकीस! स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलिसांची संयुक्त कारवाई
News 15 मराठी प्रतिनिधी — विश्वनाथ केसवड खेड,
खेड तालुक्यातील वाडा येथील भांडुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि खेड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपींकडून सुमारे ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास
दि. २२ जुलै २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडा येथील भांडुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी झाली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.
भीमा नदीजवळ सापळा चौघे ताब्यात
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खेड तालुक्यातील खरपुडी गावाच्या हद्दीत भीमा नदीच्या कडेला असलेल्या पुलाजवळ सापळा रचला. यावेळी मोटारसायकलवरून जात असलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता भांडुर्डेकर ज्वेलर्स दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुकानाचे शटर आणि कटावणीच्या साहाय्याने कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचीही माहिती तपासात समोर आली.
सोने-चांदी, मोबाईल आणि चोरीचे साहित्य जप्त
आरोपींकडून चोरीतील एकूण २ किलो १६७ ग्रॅम वजनाची चांदी, पाच मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी, पहार, पकड, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा आणि दोन मोटारसायकली असा सुमारे ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दहा गुन्ह्यांची उकल
या कारवाईत खेड पोलीस ठाण्यातील चार, घोडेगाव पोलीस ठाण्यातील चार आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण दहा गुन्ह्यांचा तपास उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी रिमांडमध्ये देण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी आणि खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश गरड करीत आहेत.
vishwanathkeswad