शिक्षक बापाकडून लाकडी खुंट्याने मुलीला बेदम मारहाण.! रुग्णालयात नेण्याऐवजी गेला योगा शिकायला... तडफडून मृत्यू?
NEWS15 मराठी रिपोर्ट - सांगली
एका उच्च शिक्षित बापाने आपल्या पोटच्या मुलीला कमी मार्क मिळाले म्हणून जात्याच्या लाकडी खुटयाने मारहान करून जीव घेतल्याची धक्कादायक घटना; सांगली जिल्ह्यातील (ता. आटपाडी) नेलकरंजी गावात घडली आहे.
मृत मुलीचं नाव साधना धोंडीराम भोसले असे असून, साधना ही आटपाडीतील एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेची बारावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील धोंडीराम भोसले हे नेलकरंजीतील एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. साधना ही बारावीत शिकत होती आणि डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. अलीकडेच NEET च्या चाचणी परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत तिला फार कमी गुण मिळाले. कमी गुण मिळल्याचे समजताच धोंडीराम भोसले यांनी तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जात्याच्या लाकडी खुंट्याने तिला मारहाण होऊ लागली. वडिलांकडून मारहाण होत असताना दोघांमध्ये शाब्दिक वादही झाले. एवढे शिकून तुम्ही तरी कुठं कलेक्टर झालात, असा उलट सवाल साधनाने तिच्या वडिलांना केला. पोरीच्या उलट बोलण्याने अहंकार दुखावलेल्या बापाने तिला आणखी मारण्यास सुरुवात केली. यात ती गंभीर जखमी झाली.
धक्कादायक बाब म्हणजे, जखमी मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी धोंडीराम भोसले दुसऱ्या दिवशी ‘योग दिन’ साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. घरी परतल्यावर साधना ही बेशुद्ध असल्याचे दिसून आले. ती कोणताच प्रतिसाद देत नसल्याने घाबरलेल्या तिच्या आई-वडिलांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, रविवारी धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे.