राजकीय : पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटात श्रीनाथ लांडे यांची सरशी तर,विजय शिंदे यांची मात्र जुळवा जुळवीतंच दमछाक..!

राजकीय : पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटात श्रीनाथ लांडे यांची सरशी तर,विजय शिंदे यांची मात्र जुळवा जुळवीतंच दमछाक..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण: खेड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणिते जुळवाजुळवीला प्रचंड वेग आला आहे. त्यातच, पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

श्रीनाथ लांडे यांची वाढती लोकप्रियता..

​पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटातून सध्या युवा आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा चेहरा म्हणून श्रीनाथ लांडे यांना मतदारांची मोठी पसंती मिळत आहे. त्यांनी आजपर्यंत पुरवलेली आरोग्य सेवा आणि सातत्याने जनतेत मिसळणारा त्यांचा चेहरा यामुळे त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून येत आहे. श्रीनाथ लांडे यांना उबाठा पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष या तिन्ही प्रमुख पक्षांकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे. मात्र, श्रीनाथ लांडे यांनी अद्याप कोणतीही राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी ते काय भूमिका घेतात, आणि कुणाला 'कात्रजचा घाट' दाखवतात, याची या जिल्हा परिषद गटात जोरदार चर्चा आहे. गटातील नागरिकांसाठी केलेली आरोग्य सेवा, गरजू नागरिकांसाठी बनलेला आधार, सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील रस्ते सुधारणा, पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळवून देण्यासाठी केलेले समाजोपयोगी काम, यामुळे श्रीनाथ लांडे यांच्यापुढे दुसरा राजकीय पर्याय गटात उरला नसल्याची चर्चा रंगली आहे.

विजय शिंदे यांची जुळवा जुळवीत दमछाक..

​दुसरीकडे, आपला मूळ गट महिलांसाठी राखीव झाल्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पिंपळगाव तर्फे खेड गटात आलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे यांना मात्र गटात जम बसवण्यासाठी करावी लागत असलेल्या राजकीय जुळवाजुळवीत अक्षरशः त्यांची दमछाक झाल्याचे चित्र आहे. ​विजय शिंदे ज्या शिंदे शिवसेनेत कार्यरत आहेत, त्याच पक्षात मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यातील प्रभावी नेते अतुल देशमुख यांचा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. याच कार्यक्रमात विजय शिंदे यांच्या गळ्यात पक्षाचा घातलेला गमछा (उपरणे) त्यांनी हळूच काढून टाकल्याचा व्हिडिओ तालुक्यात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर विजय शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यानंतर, विजय शिंदे ज्या पक्षात आणि ज्या जिल्हा परिषद गटात तयारी करत आहेत, त्याच गटातील आणि त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेले श्रीनाथ लांडे यांचा प्रवेश खुद्द शिंदे शिवसेनेत करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली. यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी विजय शिंदे व त्यांचे बंधू आणि काही सहकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्हायरल व्हिडिओबाबत सारवासारव केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या सारवासारवीवर वरिष्ठांचे समाधान होईल की नाही, हे पुढील काही दिवसात समजेलच. पण, सध्या तरी विजय शिंदे यांच्यासमोर ही निवडणूक एक मोठा आव्हानाचा डोंगर उभा असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

यावर आता विजय शिंदे कशी मात करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.