सामाजिक : खराबवाडी गावातील आरु वस्तीवर स्थानिक नागरिकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे नागरिक भोगताय नरक यातना,प्रशासनाचे दुर्लक्ष..?

सामाजिक : खराबवाडी गावातील आरु वस्तीवर स्थानिक नागरिकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे नागरिक भोगताय नरक यातना,प्रशासनाचे दुर्लक्ष..?

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : औद्योगिक दृष्ट्या महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराबवाडी गावातील आरु वस्तीवर काही नागरिकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तेथील स्थानिक नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

खराबवाडी गावातील आरुवस्तीवर बिरदवडी फाटा ते महाळुंगे इंगळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही नागरिकांनी नैसर्गिक प्रवाह अडवल्यामुळे रस्त्याच्याकडेची गटार पूर्णतः बुजली गेली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांचे रोजचे सांडपाणी थेट त्या रस्त्यावर येत असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे रोज जाणारे कंपनी कामगार,स्थानिक नागरिक,शाळेतील विद्यार्थी,वृद्ध व्यक्ती यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन शेतकरी यांच्या वादामुळे अक्षरशः स्थानिक नागरिक मेटाकुटीला आले आहेत. यावर कोणतेही प्रशासन तोडगा काढण्याची तसदी घेताना दिसत नाही.

 या रस्त्याच्या प्रश्नाच्या संदर्भात ग्रामपंचायत खराबवाडी,तहसिलदार खेड,गट विकास अधिकारी खेड पंचायत समिती यांना आरु वस्तीच्या नागरिकांनी आता आठ दिवसाचे अल्टीमेटम दिले आहे. पुढील आठ दिवसात आमच्या रस्त्याच्या संदर्भात ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्याचा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला दिला आहे. आरुवस्तीच्या नागरिकांनी निवेदनात म्हंटले आहे कि, रस्त्यावर मागील बऱ्याच दिवसापासून सांडपाणी साचून राहिल्यामुळे आमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.या दुषित साचलेल्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांना व वृद्ध व्यक्तीना या रस्त्यावरून ये जा करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत त्यामुळे आम्हा सर्व आरुवस्ती ग्रामस्थांची मागणी आहे कि,निवेदनातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन पुढील आठ दिवसात तात्काळ सांडपाणी नियोजन,नाली दुरुस्ती,रस्त्याची आवश्यक देखभाल व दुरुस्ती बाबत उपाय योजना कराव्यात अशा मागण्या निवेदनातून केल्या आहेत.

यावर आता निवेदन दिलेल्या प्रशासकीय यंत्रणा काय निर्णय घेतात आणि कोणत्या उपाय योजना करतात हेच पहावे लागेल.

प्रतिक्रिया :

आम्हाला सर्व नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही स्थानिक नागरिकांची अडचण आहे तर ती प्रशासनाने तडजोड करून सोडवावी आणि आम्हाला न्याय द्यावा. आम्ही सर्व स्थानिक १५० ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊन आठ दिवसात रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे.यावर आता आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाहीतर आम्हाला उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही.

-हनुमंत आरु,स्थानिक ग्रामस्थ...