मित्राचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला महाळुंगे पोलिसांकडून ४ तासात बेड्या...!

मित्राचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला महाळुंगे पोलिसांकडून ४ तासात बेड्या...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीचे गस्त करणारे पोलीस शिपाई बाळकृष्ण पाटोळे व शरद खैरे यांना महाळुंगे गावाच्या हद्दीतील हिंगलाज स्टोअर्स दुकानासमोर एका अनोळखी ३५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केलेल्या अवस्थेत प्रेत मिळून आले.

त्यानंतर खूण झालेल्या व्यक्तीबद्दल आजूबाजूच्या लोकांकडे तपास केला असता खून झालेल्या व्यक्तीचे दिपक काशीराम राठोड वय अंदाजे ३५ वर्षे रा. वाशीमचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या खुनाच्या बाबत अज्ञात आरोपीच्या विरुद्ध महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ११८/२०२३ भा. द. वि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांनी लागलीच घटनास्थळाला भेट देऊन गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना अज्ञात आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार मयत दीपक काशिनाथ राठोड हा आरोपी विठ्ठल मंगेश चव्हाण वय २२ वर्षे, मुळगाव आंधबोरी,ता. किनवट, जि. नांदेड यांच्यासोबत महाळुंगे येथे रूम करून राहत असल्याचे व ते दोघेजण रात्री दारू पिऊन एकत्र चायनीज गाड्यावर जेवणासाठी आले असता त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तांत्रिक बाजूच्या आधारे आरोपी विठ्ठल मंगेश चव्हाण याचा शोध घेत असताना तो नांदेड येथे मुळगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन तपास करता त्याने किरकोळ वादातून मयत दीपक राठोड याच्या सोबत झटापट झाल्यावर त्यास रोडवर खाली पाडून त्याच्या डोक्याला दगड टाकून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली.

आरोपी मंगेश चव्हाण याला २० जानेवारी २०२३ रोजी ११:३० वाजता अटक करण्यात आली आहे. सध्या खुनातील आरोपीला 24 जानेवारीला 23 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त परिमंडळ-१ चे विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) किशोर पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस अंमलदार राजू राठोड, राजेंद्र कोणकीरे, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, प्रशांत ठोबरे, संतोष काळे, राजेंद्र खेडकर, अमोल माटे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, बाळकृष्ण पाटोळे, सचिन माने,राहुल मिसाळ, भाग्यश्री जमदाडे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पाटील हे करीत आहेत.