बीड जिल्ह्यात अजूनही गुन्हेगारी कायम.! नागरिकांना नाही कायद्याचा धाक? महिलेला जमिनीवर ढकलून ट्रॅक्टर अंगावर घातला...

बीड जिल्ह्यात अजूनही गुन्हेगारी कायम.! नागरिकांना नाही कायद्याचा धाक? महिलेला जमिनीवर ढकलून ट्रॅक्टर अंगावर घातला...

बीड रिपोर्ट - 

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर समोर आलेली बीड जिल्ह्यातील गुंडगिरी आणि गुन्हेगारी अजूनही संपलेली दिसत नाही.! दर आठवड्याला काही न काही घटना बीड जिल्ह्यात घडत असून, पुन्हा एकदा अशीच एक हत्येचा प्रयत्न करणारी घटना समोर आली आहे.

बीडच्या शिरूर कासार येथे शेतजमिनीच्या वादातून जबर मारहाण करत; महिलेला ट्रॅक्टरने उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; जुन्या शेतजमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान वाद उफाळून आला. या वादादरम्यान आरोपींनी महिलेला बेल्टनं मारहाण केली, तसेच तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे घडली असून, महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित महिला बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन तांबा येथील रहिवासी आहे. पती हयात नसल्यामुळे महिला आपल्या चुलत सासऱ्यांसोबत राहते. १० जूनला दुपारच्या सुमारास पीडित महिला आणि तिचे सासरे शेतावर गेले होते. त्याठिकाणी आरोपी दिपक दत्तात्रय खोले, नानासाहेब लक्ष्मण तांबे, रामेश्वर भानुदास औसरमल ट्रॅक्टर घेऊन तेथे पोहोचले. यानंतर शेतात वाद सुरू झाला. 'शेत तुझ्या बापाचे आहे का?' असं म्हणत दिपक दत्तात्रय खोले याने महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यास सुरूवात केली. तसेच शिवीगाळ देण्यास सुरूवात केली. महिलेनं स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, नानासाहेब लक्ष्मण खोले यानं महिलेला जमिनीवर ढकललं आणि बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली, असा आरोप महिलेनं केला.त्यानंतर रामेश्वर भानुदास औसरमल या आरोपीने ट्रॅक्टर घेऊन महिलेच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. महिलेनं आरोपींच्या तावडीतून कसाबसा सुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच तिन्ही आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जखमी महिलेवर सध्या बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.