अपहरणाचा बनाव करून तरुणाचा खून; अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद कंपनीतील जुन्या वादाचा राग मनात धरून मित्रानेच रचला हत्येचा कट; दोघांना अटक

अपहरणाचा बनाव करून तरुणाचा खून; अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद कंपनीतील जुन्या वादाचा राग मनात धरून मित्रानेच रचला हत्येचा कट; दोघांना अटक

मावळ : प्रतिनिधी विश्वनाथ केसवड,

 

मावळ : शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओझर्डे गावाच्या परिसरात निर्जन ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. कंपनीतील जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच तरुणाला संपवल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत एका निर्जन मोकळ्या जागेत ३५ ते ४० वयोगटातील व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती शिरगाव परंदवडी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे तसेच घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले.

प्राथमिक तपासादरम्यान हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला. त्यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मागील दोन दिवसांत दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याची माहिती समोर आली.

टाटा सोसायटी, सोमाटणे फाटा येथून एका अज्ञात व्यक्तीने तरुणाचे अपहरण केल्याची तक्रार दाखल असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. घटनास्थळी बोलावण्यात आल्यानंतर मृत तरुणाच्या भावाने त्याची ओळख पटवली. मृताचे नाव योगेश अरुण भांबरे असल्याचे निष्पन्न झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी योगेश भांबरे हा आपल्या मित्राकडे खरवस करण्यासाठी लागणारे चिक/गायीचे कच्चे दूध आणण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचाच कंपनीत काम करणारा मित्र सिद्धेश भगवान साळुंके (वय २३, रा. सडवली, ता. मावळ) याने कंपनीतील सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरला होता.

याच रागातून योगेशचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचे तपासात उघड झाले. दूध देण्याच्या बहाण्याने सिद्धेशने योगेशला त्याच्या राहत्या घरातून उर्से येथे बोलावून घेतले. त्यानंतर स्वतःच्या बुलेट दुचाकीवर बसवून त्याला ओझर्डे येथील निर्जन ठिकाणी नेले.

तेथे आधीपासून दबा धरून बसलेला त्याचा साथीदार संदीप बाळू चव्हाण (वय २६, रा. भाऊरवाडी, ता. मावळ) याच्यासह दोघांनी योगेशच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयता व लाकडी काठीने वार केले. या हल्ल्यात योगेशचा मृत्यू झाला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३८, १४०(३) अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख आणि सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

या पथकात पोलीस अधिकारी व अंमलदार रत्नमाला सांवत/चौधरी, अशोक केंद्रे, नईद शेख, विठ्ठल काळे, दिनकर भुजबळ, मारुती सोनटक्के, सचिन काचोळे, काजल आघाव, संतोष दिघे, चंद्रधर कोंडे, मुरलीधर कोकरे, योगेश गुलिंग, सुधीर वाडीले, किशोर गिरिगोसावी, अमोल गोरे, प्रसाद जंगिलवाड, संतोष तांबे आणि संतोष शिंदे यांचा समावेश होता.