अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला ५ वर्षांचा कारावास! भोसरी पोलिसांच्या तपासाला यश

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला ५ वर्षांचा कारावास! भोसरी पोलिसांच्या तपासाला यश

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी विश्वनाथ केसवड 

 अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपीला न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादामुळे आरोपीला शिक्षा झाली आहे.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ८, १० आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात आरोपी दिनेश बाबूराम चौधरी (वय २८ वर्षे) याला दोषी ठरवून विशेष न्यायाधीश एस. एन. यादव यांनी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल २४ नोव्हेंबर २०२६ रोजी देण्यात आला.

३० दिवसांत तपास पूर्ण; न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा दशवंत यांनी केला. त्यांनी अवघ्या ३० दिवसांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटला जलदगतीने चालविण्यासाठी अभियोग पक्षाच्या वतीने न्यायालयात विनंती करण्यात आली होती.

त्यानुसार न्यायालयाने प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेऊन निकाल दिला.

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा

* भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) : २ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड.

* POCSO कलम ८ : ३ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड.

* POCSO कलम १० : ५ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड.

* POCSO कलम १२ : २ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड.

न्यायालयाने या सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोपीला एकूण ५ वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे.

या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. स्मिता चोगले यांनी सरकार पक्षाची प्रभावी बाजू मांडली. तर कोर्ट पैरवी अधिकारी म. पोहेवा संगीता सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात समन्वय साधला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास आणि जलद न्यायालयीन प्रक्रिया किती महत्त्वाची आहे, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.