तहसील कार्यालय की ईव्ही चार्जिंग सेंटर? सरकारी विजेवर कर्मचाऱ्याची दुचाकी चार्ज...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
खेड तहसील कार्यालयातील उपकोषागार कार्यालयात एका महसूल कर्मचाऱ्याने स्वतःची इलेक्ट्रिक दुचाकी चक्क सरकारी कार्यालयातील वीज बोर्डाला जोडून चार्जिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याने सरकारी विजेच्या वैयक्तिक वापराबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याने आपली इलेक्ट्रिक दुचाकी कार्यालयातील वीज जोडणीला लावून चार्जिंग केली. याबाबत संबंधित कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, गाडी माझीच आहे आणि चार्जिंग संपली आहे, त्यामुळे चार्जिंग करत आहे, असे त्याने सांगितल्याचे समोर आले आहे.
सरकारी कार्यालयातील वीज वापराचा खर्च हा सार्वजनिक निधीतून केला जातो. अशा परिस्थितीत शासकीय कार्यालयातील वीज वैयक्तिक वाहनाच्या चार्जिंगसाठी वापरणे नियमांनुसार योग्य आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या ईव्हीच्या चार्जिंगसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती झाला? संबंधित वीजबिलाची रक्कम कोण भरणार? सरकारी वीज वैयक्तिक वापरासाठी झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याकडून हा खर्च वसूल केला जाणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयातील संसाधनांचा वैयक्तिक कारणासाठी वापर करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी होती का, याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, या प्रकाराची खेड तहसीलदार तसेच संबंधित वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाणार का? संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का? सरकारी विजेच्या वैयक्तिक वापराचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
vishwanathkeswad