शिरूरमध्ये भल्या पहाटे गोळीबाराचा थरार! आंबेडकर नगरमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

शिरूरमध्ये भल्या पहाटे गोळीबाराचा थरार! आंबेडकर नगरमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

विशेष प्रतिनिधी शिरूर,

शिरूर : शिरूर शहरात शुक्रवारची सकाळ गोळीबाराच्या घटनेने हादरली. लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पहाटेच्या सुमारास अचानक गोळ्यांचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही क्षणांतच घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. रक्ताच्या थारोळ्यात तरुण पडल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

हत्या नेमकी कोणत्या कारणातून?

तरुणावर अचानक गोळीबार करण्यामागे नेमके कारण काय, हल्लेखोरांची संख्या किती होती आणि या हत्येमागे पूर्ववैमनस्याचा संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

भरवस्तीत, सकाळच्या वेळेत थेट गोळीबार करून तरुणाची हत्या झाल्याने शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, मृत तरुणाची ओळख, हत्येचे नेमके कारण आणि आरोपींबाबतची अधिकृत माहिती पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.