चाकणमध्ये दादागिरी कराल तर पाताळातूनही शोधून काढू; गुन्हेगारांना पोलिसांचा सज्जड दम!
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
चाकण : उद्योगनगरी आणि वाहतुकीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना चाकण दक्षिण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. किरकोळ कारणावरून डंपर चालकाच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारून गंभीर दुखापत करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत त्यांना बेड्या ठोकल्या. आरोपी एक कर्नाटकातील बिदर येथे तर दुसरा लातूर येथे पळून गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास नाणेकरवाडी येथील गोदामाजवळ डंपर चालक महादेव शंकर सोळंके (वय ३६) हे आपले वाहन घेऊन जात होते. यावेळी रस्त्यात डंपरचा हॉर्न वाजल्याच्या कारणावरून आरोपी हरिदास रामकिशन कलबोले (वय १८ वर्षे २ महिने) आणि लक्ष्मण तातेराव आवळे (वय २३) यांनी चालक महादेव सोळंके यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीदरम्यान आरोपींनी लोखंडी टॉमीने सोळंके यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले.
याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाकण दक्षिण पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे प्रकटीकरण शाखेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत घटनास्थळ परिसरातील तब्बल २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी हरिदास कलबोले हा कर्नाटक राज्यातील बिदर येथे, तर लक्ष्मण आवळे हा लातूर येथे गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने क्षणाचाही विलंब न करता आरोपींचा पाठलाग केला. दोन्ही ठिकाणी कारवाई करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
घटनेपासून अवघ्या १२ तासांच्या आत दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने चाकण दक्षिण पोलिसांच्या तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
गुन्हेगारांना पोलिसांचा स्पष्ट इशारा
चाकण परिसरात किरकोळ कारणावरून दादागिरी, मारामारी किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांना या कारवाईतून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे. गुन्हा करून कुठेही पळून गेलात तरी आधुनिक तपास यंत्रणा आणि पोलिसांच्या पथकापासून सुटका होणार नाही, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, मा. शशिकांत महावरकर, सह-पोलीस आयुक्त, मा. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, मा. बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त व मा. योगेश रांजणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सोमेनाथ जाधव, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोते, तसेच पोलीस अंमलदार शिवाजी चव्हाण, सुनील भागवत, रेवणास खेडकर, राहुल मिसाळ, गजानन चव्हाण, आदम शेख, प्रियंका गिरी आणि विशाल बेंड यांनी सदर कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
vishwanathkeswad