एकाच घरात हत्या आणि आत्महत्या; मामाचा कोयत्याने खून, भाच्याने गळफास घेतला सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण

एकाच घरात हत्या आणि आत्महत्या; मामाचा कोयत्याने खून, भाच्याने गळफास घेतला सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,

राजगुरूनगर : राजगुरूनगर शहरातील माधवनगर परिसरात शनिवारी एकाच घरात हत्या आणि आत्महत्येची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आजारपणामुळे उपचारासाठी भाच्याच्या घरी वास्तव्यास असलेल्या मामाचा धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्यानंतर भाच्याने त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेत संदीप वामन गडदे (वय ४३) यांचा मृत्यू झाला असून, प्रवीण कैलास कोहिणकर (वय २०) याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

उपचारासाठी मामाचा भाच्याच्या घरी मुक्काम

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संदीप गडदे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. उपचार आणि देखभालीसाठी ते सुमारे दोन महिन्यांपासून माधवनगर परिसरातील भाच्याच्या घरी वास्तव्यास होते.

शनिवारी सकाळच्या सुमारास घरात अचानक हा धक्कादायक प्रकार घडला.

मानेवर कोयत्याने वार; त्यानंतर गळफास

प्राथमिक माहितीनुसार, प्रवीण कोहिणकर याने धारदार कोयत्याने संदीप गडदे यांच्या मानेवर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने गडदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रवीणने त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

एकाच घरात मामाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, तर भाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.

सुसाईड नोटमध्ये मामाच्या त्रासाचा उल्लेख?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान प्रवीणने लिहिलेली सुसाईड नोट आढळल्याची प्राथमिक माहिती आहे.

या चिठ्ठीत ‘मामाच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे’, असा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. मात्र, कथित त्रासाचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कौटुंबिक वाद, आर्थिक कारण अथवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

खेड पोलिसांकडून तपास सुरू

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

सुसाईड नोट, घटनास्थळावरील पुरावे आणि कुटुंबीयांकडून मिळणारी माहिती याच्या आधारे खेड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

एकाच घरात काही क्षणांच्या अंतराने हत्या आणि आत्महत्येचा प्रकार घडल्याने माधवनगर परिसर हादरला असून, या घटनेमागील नेमके कारण काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.