चाकण पोलीस नेमके करतात तरी काय? ब्लॅक फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट आणि बिना नंबरच्या गाड्यांचा खुलेआम सुळसुळाट!

चाकण पोलीस नेमके करतात तरी काय? ब्लॅक फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट आणि बिना नंबरच्या गाड्यांचा खुलेआम सुळसुळाट!

रस्त्यावर कायद्याची भीती संपली? पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियमभंग करणाऱ्यांना मोकळे रान असल्याचा नागरिकांचा आरोप

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, चाकण

औद्योगिक नगरी म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या चाकणमध्ये वाहतूक नियमांची अक्षरशः खुलेआम पायमल्ली सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक वाहनांच्या काचांवर काळी फिल्म, नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट, तर काही वाहनांवर नंबर प्लेटच नसतानाही अशी वाहने चाकणच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, हा प्रकार एक-दोन दिवसांचा नसून सातत्याने दिसून येत असतानाही प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई का होत नाही, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पोलीसांना हे वाहनांचे प्रकार दिसत नाहीत की दिसूनही दुर्लक्ष केले जात आहे? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.

ब्लॅक फिल्ममुळे वाहनात नेमके कोण बसले आहे, कोण फिरत आहे, याची ओळख सहजपणे होत नाही. तर नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची ओळख पटविणे गंभीर घटना किंवा गुन्ह्यानंतर अडचणीचे ठरू शकते. नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेटमुळेही वाहन क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही.

चाकण हा मोठा औद्योगिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील परिसर आहे. हजारो कामगार, नागरिक आणि अवजड वाहनांची दररोज मोठी वर्दळ असताना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अधिक सतर्क राहणे अपेक्षित आहे. मात्र, नियम मोडणारे वाहनचालक कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता खुलेआम फिरत असल्याने चाकणमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन-तीन दिवस नाही, तर धडक कारवाई करून दाखवा!

नागरिकांनी चाकण पोलीस आणि वाहतूक प्रशासनाने तातडीने विशेष धडक मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे. शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, एमआयडीसी परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी करून ब्लॅक फिल्म, बिना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची तपासणी करावी.

कोणाची गाडी आहे, कोणाचा दबाव आहे, कोण किती मोठा आहे हे न पाहता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे!

आता नागरिकांचा इशारा...

कायद्याची अंमलबजावणी फक्त सर्वसामान्यांपुरतीच आहे का? चाकणच्या रस्त्यांवर खुलेआम नियम तोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कधी कारवाई करणार?

पोलीस प्रशासनाने केवळ अधूनमधून मोहीम राबवून फोटोसेशन करण्यापेक्षा प्रत्यक्षात सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाई करून दाखवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. बिना नंबर, ब्लॅक फिल्म आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्न आणखी तीव्र होणार आहेत.