अंधश्रद्धेवर थेट प्रहार! ‘या भोंदूंनी तुला गंडवलं’ नाटकातून चाकणमध्ये जनजागृती भोंदूबाबांच्या फसवणुकीचा पर्दाफाश; गणेशोत्सवात आझाद हिंद मंडळात सामाजिक प्रबोधनाचा जिवंत देखावा
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
चाकण : अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांची होणारी फसवणूक, भोंदूबाबांची गंडवणूक आणि समाजातील गैरसमजांवर थेट प्रहार करणारे ‘या भोंदूंनी तुला गंडवलं’ हे नाटक यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आझाद हिंद मंडळ, चाकण येथे सादर करण्यात येत आहे.
वडवानल प्रोडक्शन प्रस्तुत या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दीपक मांडेकर यांनी केले असून, वडवानल प्रोडक्शनच्या कलाकारांचा यात सहभाग आहे. केवळ मनोरंजन न करता अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश या जिवंत देखाव्यातून देण्यात येत आहे.
अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर होणारी फसवणूक, भोंदूगिरीचे विविध प्रकार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या गर्दीत हा देखावा मनोरंजनासोबत विचार करायला लावणारा सामाजिक संदेश देताना दिसत आहे.
२०-२५ वर्षांपासून कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान
वडवानल प्रोडक्शन गेल्या सुमारे २० ते २५ वर्षांपासून नाटक, चित्रपट आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. या काळात अनेक कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण देतानाच स्थानिक कलाकारांना विविध सांस्कृतिक उपक्रम आणि कलाकृतींच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
चाकण परिसरात सांस्कृतिक आणि कलाविषयक वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे दीपक मांडेकर यांनी सांगितले.
आज चाकणमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांकडून जिवंत देखावे सादर केले जात असून, त्यामध्ये स्थानिक कलाकार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. या सांस्कृतिक चळवळीला स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून प्रशिक्षण आणि कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून चालना देण्याचे काम वडवानल प्रोडक्शन करत असल्याचेही मांडेकर यांनी नमूद केले.
दहा दिवस गणेशभक्तांसाठी देखावा खुला
आझाद हिंद मंडळ, चाकण येथे गणेशोत्सवानिमित्त सादर करण्यात आलेला हा जिवंत देखावा दहा दिवस गणेशभक्त आणि नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
अंधश्रद्धेवर विचार करण्यास भाग पाडणारा, भोंदूगिरीविरोधात जनजागृती करणारा आणि विवेकाचा संदेश देणारा हा देखावा नागरिकांनी मोठ्या संख्येने पाहावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
vishwanathkeswad