जलसंपदा विभागाची कार्यालये पुण्यातच ठेवा; आमदार बाबाजी काळे यांची मागणी...
प्रतिनिधी :- विश्वनाथ केसवड - खेड
जलसंपदा विभागांतर्गत पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालये कोल्हापूर आणि सोलापूर येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला आमदार बाबाजी काळे यांनी विरोध दर्शवत हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
याबाबत त्यांनी राधाकृष्णा विखे पाटील यांना निवेदन सादर केले असून, पुणे हे राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय, शैक्षणिक आणि तांत्रिक केंद्र असल्याने जलसंपदा विभागाची प्रमुख कार्यालये येथेच कायम ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
कार्यालयांच्या स्थलांतरामुळे प्रकल्पांचे नियोजन, तांत्रिक मान्यता, निधी मंजुरी, अंमलबजावणी तसेच नागरिक व लोकप्रतिनिधींच्या कामकाजात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय मंत्रालय आणि विभागीय कार्यालयांमधील समन्वय प्रक्रियेत विलंब होऊन प्रशासकीय कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
पुणे हे सिंचन, धरण, कालवा, जलविद्युत आणि जलव्यवस्थापन प्रकल्पांचे केंद्रबिंदू असल्याने येथील मुख्य अभियंता कार्यालयांचे स्थलांतर व्यवहार्य नसल्याचे मत आमदार बाबाजी काळे यांनी मांडले आहे.
त्यामुळे जलसंपदा विभागाची कोल्हापूर व सोलापूर येथे स्थलांतरित होणारी दोन्ही कार्यालये पूर्ववत पुण्यातच कायम ठेवावीत, अशी ठाम मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.