डंके की चोट पर विकास केला, पुढेही करू - महाविजय संकल्प सभेत नितीन गडकरी यांचे आश्वासन...

डंके की चोट पर विकास केला, पुढेही करू - महाविजय संकल्प सभेत नितीन गडकरी यांचे आश्वासन...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा (लातूर)

निलंगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवत आम्हाला निवडून दिल्यानेच देशात गतिमान पध्दतीने विकास कामे होत आहेत. ही निवडणूक केवळ खा. सुधाकर शृंगारे यांचे भवितव्य ठरविणारी नाही तर जनतेच्या भविष्याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. लातूर जिल्ह्यासाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर व खा. सुधाकर शृंगारे यांनी आजपर्यंत विविध योजना खेचून आणलेल्या आहेत. शिवाय  विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे असे  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री विकासपुरूष नितीन गडकरी यांनी प्रतिपादन केले .

महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विराट महाविजय संकल्प सभेत केंद्रीय मंत्री. गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे मंत्री संजय बनसोडे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर, लोकसभा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अमर राजुरकर, आ. देवराज होळी, माजी आ. गोविंद केंद्रे, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, विश्‍वजीत गायकवाड, जि. प.चे माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे, पंडीत धुमाळ, राष्ट्रवादीचे व्यंकट बेद्रे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रोहीत कराड, युवा नेते ऋषिकेश कराड, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, शिवसेनेचे सुधीर पाटील, विनोद आर्य, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, निलंगा विधानसभा प्रभारी दगडू सोळंके, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अ‍ॅड. संभाजीराव पाटील, जयश्रीताई पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे मार्गदर्शन करताना नितीन गडकरी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत  नागरिकांना खिळवून ठेवले. विरोधकांचा समाचार घेताना गडकरी म्हणाले की, मागील दहा वर्षात केंद्रातील सरकारने जनविकासाची खूप कामे केली आहेत. अजूनही कामे शिल्लकच आहेत. विकासाला प्राथमिकता देवून भाजप सरकार काम करत आहे. परंतु विरोधक अपप्रचार करत आहेत. भाजपाला बहुमत मिळाल्यास संविधान बदलणार असल्याची चर्चा  केली जात आहे. परंतु घटनेतील मुलभूत तत्त्व बदलता येत नाहीत. सर्वोच्च न्यायालयानेही तसा निर्णय दिलेला आहे. संविधानाच्या दुसर्‍या टप्प्याची मात्र काँग्रेसने 80 वेळा तोडफोड केली. आणिबाणीच्या काळात संविधानाची एैशीतैशी करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले.

गडकरी यांनी सांगितले की, जाती-पातीच्या राजकारणाने जनतेचे कल्याण होत नाही. गरीबीला कधीही जात नसते. देशातील महागाई, गरिबी, बेरोजगारी कमी करण्यासाठी भाजपा सरकार अविश्रांतपणे काम करत आहे. त्यातूनच आज दिसणारा विकास झालेला आहे. या विकासाचे श्रेय आम्हा नेते मंडळींचे नाही तर देशातील जनतेचेच आहे. जनतेने आम्हाला निवडून दिले नसते तर हा विकास करणे शक्यही झाले नसते, असे देखील गडकरी म्हणाले.

उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले की, मागील दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने जबरदस्त कामे केली आहेत. या कामाला कसलीही तोड नाही. पायाभूत सुविधा, रेल्वे, रोजगार याबाबतीत मोठ्या प्रमाणात कामे झाली. ही निवडणूक देशाचा कारभार कोणाकडे सोपवायचा याच्यासाठी होत आहे. त्यामुळे जनतेने विचार करून विकासाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्यातील सरकारने रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या. राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला असेही चव्हाण म्हणाले.

यावेळी मार्गदर्शन करताना लोकसभा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी गडकरी हे आपल्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणारे नेते असल्याचे सांगितले. लातूर जिल्ह्याचा पालक म्हणून गडकरी यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आ. निलंगेकर म्हणाले की, गडकरी यांनी जिल्ह्याला चार राष्ट्रीय महामार्ग दिले. आता निलंगा विधानसभा मतदारसंघातून जाणार्‍या रेल्वेचे सर्वेक्षण झाले आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी ही रेल्वेलाईन असून ती आपल्या शब्दावर पूर्ण होवू शकते, असेही ते म्हणाले. लातूर जिल्हा हा विकासाच्या मुद्यावर मतदान करतो. त्या भागात विकास पुरूष नितीन गडकरी यांचा पदस्पर्श झाल्याने या परिसराचे सोने होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.तत्पूर्वी उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, ना. संजय बनसोडे, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, अ‍ॅड. जयश्री पाटील, शिवाजी माने आदींनी मतदारांशी संवाद साधत भाजपा महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.