धूरमुक्त शाळांचा संकल्प अपूर्ण.! अनेक शाळांत चुलीवरच स्वयंपाक ; एलपीजी गॅस कनेक्शन मिळालेच नाही...

धूरमुक्त  शाळांचा संकल्प अपूर्ण.! अनेक शाळांत चुलीवरच स्वयंपाक ; एलपीजी गॅस कनेक्शन मिळालेच नाही...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास मध्यान्ह भोजन देण्यात येत असून,त्यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येक शाळांमध्ये किचन शेडची निर्मिती करण्यात आली. असे असताना देखील जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये चुलीवरच अन्न शिजवले जाते. त्यामुळे या शाळांमधून नेहमीच दूर निघत असल्याचे चित्र पहावयास मिळत  होते. दरम्यान सर्व शाळांना मध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला. मात्र वर्ष लोटू नये त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने अध्यापही शाळांतील स्वयंपाक धुरयुक्तच आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासह त्यांचे आरोग्य ही चांगले राहावे, जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असलेली विद्यार्थ्यांची गळती थांबावी, त्यांना शाळेची ओढ लागावी, यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टीत प्रमाणानुसार मध्यान्ह देण्यात येते. त्यानुसार बऱ्याच शाळांमध्ये चुलीवरच स्वयंपाक करण्यात येत होता. त्यातच या शाळांमध्ये देण्यात आलेले किचन शेड फायबरचे असल्याने चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी संबंधित स्वयंपाकी व मदतनिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील किचन शेड केवळ साहित्य ठेवण्याच्या कामी येत असतानाच जुन्या वर्ग खोलीत अन्न शिजवण्यात येत आहे तर चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा बंदोबस्त करणे आदी अतिरिक्त काम शिक्षकांकडे आले होते. त्यातच शाळांमध्ये वर्गखोल्या चुलीपासून निघणाऱ्या धुरामुळे काळपट झाल्या असताना या धुरामुळे अनेक आजारांना आमंत्रण देण्यात येत आहे.दरम्यान आता शासन स्तरावर याविषयी निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येकच शाळांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येणार होते. परंतु वर्ष लोटूनही त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने परिणामी सरपण गोळा करून धूरयुक्त स्वयंपाक सुरू आहे.