सोशल मिडीयाव्दारे कांदा उत्पादकांना इशारा; शेतकर्‍यांमध्ये संताप...

सोशल मिडीयाव्दारे कांदा उत्पादकांना इशारा; शेतकर्‍यांमध्ये संताप...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : दिंडोरीत भाजपचा खासदार नसेल तर पुढील पाच वर्ष कांद्याला भाव राहणार नाही.मोदी व शहा यांच्या हातातच कांद्याचे भवितव्य आहे. त्यामुळे स्वत: चे नुकसान होईल, असे कृत्य करु नका,अशा आशायाचे पोस्ट सोशल मिडीयावर टाकून भाजप कार्यकर्त्यानी कांदा उत्पादकांना इशारा दिल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात कांदा उत्पादक शेतकर्‍यांची संख्या लक्षणीय आहे.इतर देशामध्ये कांद्याला मागणी व चांगला भाव असतांनाही केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करत ती कायम ठेवल्यामुळे कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच भाजप सरकारवर नाराज आहे.त्याची प्रचिती दिंडोरी लोकसभा मतदार संघात येत असून सत्ताधारी पक्षाला प्रचारात कांदा मुद्दा हा अडचणीचा ठरत आहे. दिंडोरी लोकसभेत कांदा भाजपचा वांदा करेल,अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांनाच भाजपच्या कार्यकर्त्यांने कांदा निर्यात बंदी नाराजीमुळे भास्कर भगरेंना निवडून दिले तर कांद्याला भाव मिळेल का? निर्यात खुली होईल का?असे सवाल करत केंद्रात मोदीचेच सरकार येणार आहे,असा दावा करतांनाच जर येथे भाजपचा खासदार निवडून न दिल्यास पाच वर्ष कांद्याला भाव राहणार नाही. निर्यात बंदी अशीच ठेवतील व मोदी व शहा विरोधी पक्षाच्या खासदारांवर खापर फोडतील,असा इशारा  व्हायरल पोस्टव्दारे देण्यात आला आहे.अशा पोस्ट व्हायरल केल्याने अगोदरच नाराज असलेल्या शेतकर्‍यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून शेतकर्‍यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत नाराजीचा सुर उमटत आहे.

सदर पोस्ट विरोधात टिकेची झोड उठवली असून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळू नका,असे खडेबोल सुनावले जात आहे.

या पाच वर्षांच्या काळामध्ये असलेल्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कांद्यासाठी व शेतकर्‍यांसाठी कुठेलेही आंदोलन केले नाही.दुसरा प्रश्‍न असा की, जे कुणी कार्यकर्ते  सोशल मिडीयावर पोस्ट प्रसारीक करत आहे ते स्वत: शेतकरी नाही का?आणि असतील तर त्यांच्या आंतरमनात त्यांना जाणवत नाही का? शेतकर्‍यांच्या व्यथा त्यांना माहिती नाही का? की फक्त सत्तेत असलेल्या नेत्यांची वाह वाह करण्यासाठी आपली वडीलोपार्जित शेती व्यवसायाला आतापर्यंत नाडलं गेले आहे म्हणून आपण काही बोलायचं नाही का? 

 सुदर्शन जाधव - (शेतकरी मोहाडी)