मार्च अखेरच्या लगीनघाईत विकास कामाचा दर्जा खालावला?

मार्च अखेरच्या लगीनघाईत विकास कामाचा दर्जा खालावला?

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

सध्या गावा - गावात अनेक योजनेच्या माध्यमातून विकास कामे मंजूर करण्यात आली असून, ग्रामपंचायतच्या हद्दीत ही कामे धूमधडाक्यात सुरू आहेत. मंजूर झालेली विकास कामे ग्रामपंचायतच्या नावाने असली तरीही, ही कामे स्थानिक ग्रामपंचायत करीत नसून, काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्ते करीत असल्याचे बोलले जात आहे. तर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा बांधकामाचा अनुभव नसून सुद्धा बांधकाम करीत असल्याचा आरोप केला जातोय. तर जास्तीत जास्त फायदा कमावण्याच्या नादात हे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचे गावातील नागरिकांच्या बोंबा आहेत.

सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, अवघ्या काही दिवसांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. अशातच राज्यात आचारसंहिता लागली असल्याने, सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी हे सुद्धा निवडणूक कामकाजात व्यस्त आहेत. त्यामुळे ठेकेदार हे बांधकामाच्या अंदाजपत्रकाला तिलांजली देत आपल्या मनमर्जीने काम करत आहेत. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम करण्यात येत आहे. काही नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्यात; मात्र आचारसंहिता असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. संबंधित अधिकाऱ्यांचा त्या कामाला पाठिंबा मिळत असल्याने ठेकेदाराचे चांगलेच फायदे आहे. एकीकडे मार्च एंडिंग तर दुसरीकडे आचारसंहिता यात कॉन्ट्रॅक्टदाराचे बल्ले बल्ले झाले आहे.