जिद्दीने प्रयत्न केल्यास यश निश्चित - प्रवीण नाना जाधव

जिद्दीने प्रयत्न केल्यास यश निश्चित - प्रवीण नाना जाधव

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्ध व चिकाटी ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन मविप्र संचालक प्रवीण जाधव यांनी केले.

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी विनय सुनील पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १२२वी रँक प्राप्त केली त्याबद्दल त्याचा सत्कार सोहळा कार्यक्रमप्रसंगी प्रवीण  जाधव बोलत होते.

ते पुढे म्हणाले; शेतकरी कुटुंबात व ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी,समस्या असतात परंतु तरीही त्यावर मात करून ऑनलाईन स्वयंम अध्ययन करत विनय पाटीलने जे यश मिळविले आहे त्याचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे व यश मिळवून आई वडील,गुरुजन, मविप्र संस्था,शाळा यांचा नावलौकिक वाढवावा असे ही जाधव यांनी आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर  माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव,जेष्ठ सदस्य शिवाजी जाधव, बाळासाहेब जाधव,सोमनाथ सोनवणे, सुभाष बोरस्ते,मनोजढिकले,साहेबराव घोलप, उप प्राचार्य उत्तम भरसठ पर्यवेक्षक प्रतिभा मापारी,सविता शिंदे,रावसाहेब उशीर,आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेच्यावतीने आय ए एस विनय पाटील यांचा व वडील सुनील पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विनय पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना मला माझ्या आई वडीलांकडून शिकण्याची प्रेरणा मिळाली.आत्मविश्वास,अपार कष्टाची तयारी,कुटूंबाची साथ आणि स्वयंअध्ययनातून हे यश मिळाले. ग्रामीण भागातील मुलांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता प्रामाणिक प्रयत्न करावेत.वेळेचा सदुपयोग करावा,असे प्रतिपादन आयएएस विनय सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सरला कदम यांनी तर आभार संतोष कथार यांनी मानले.