सप्तशृंगगडासाठी ई-बसला प्रवाशांकडून प्रतिसाद.! आठवड्यात २ लाख ३२ हजारांचा व्यवसाय...

सप्तशृंगगडासाठी ई-बसला प्रवाशांकडून प्रतिसाद.! आठवड्यात २ लाख ३२ हजारांचा व्यवसाय...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, दिंडोरी

नांदुरी येथील श्री क्षेत्र श्री सप्तश्रृंगगडावर १ एप्रिलपासून सुरू झालेल्या नाशिक ते सप्तश्रृंगीगड वातानुकूलित इ- बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसचा आठवड्यात ६ हजार किलोमीटरचा प्रवास होऊन २ लाख ३२ हजाराचा व्यवसाय या दोन्ही इ-बसने दिला आहे.

नाशिकहून सकाळी ५  व ५ः ३०, दुपारी ११:३० व १२, सायंकाळी ६ व ६ : ३० या कालावधीत निघणाऱ्या या दोन इ-बसमधून थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशास १७० रुपये भाडे आहे. या बसल दिंडोरी, वणी, नांदुरी असे थांबे देखील आहेत. दोन तास चार्जिंग केल्यावर १७५ किलोमीटरचा प्रवास होतो. दोन बस दिवसभरात परतीच्या अशा एकूण १२फेऱ्या पूर्ण करतात. साध्या बसने ११५ रुपयात होणारा हा प्रवास या इ-बसमध्ये १७० रुपयांत होतो. ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित बससेवेमुळे प्रवाशांमध्ये समाधान असले तरी ही बससेवा अद्याप नफ्यात नाही. कारण, ठिकठिकाणी थांबा व ज्येष्ठ नागरिक व महिलांना अर्ध तिकीट तसेच ७५ च्या पुढील नागरिकांना मोफत प्रवास या सुविधा या बसला लागू आहेत. विद्यार्थ्यांना ही सेवा लागू नाही. सप्तश्रृंगीदेवी गड रस्ता घाट व वळणाचा आहे. मात्र याचा कुठलाही परिणाम या इ-बसवर नसून पिकअपवरही काही परिणाम नाही. ठिकठिकाणी थांब्यामुळे काही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो.

यंदा १६ एप्रिलपासून चैत्रोत्सव सुरू होत असल्याने बसला प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे.