महाराष्ट्र हादरला.! एकाच घरात आढळले ४ मृतदेह - हत्या की आत्महत्या?

महाराष्ट्र हादरला.! एकाच घरात आढळले ४ मृतदेह - हत्या की आत्महत्या?

मुदखेड (नांदेड)


नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा (मुरार) गावात घडलेल्या एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावात भीती, दुःख आणि प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही आत्महत्या आहे की यामागे काही वेगळंच भयावह सत्य दडलं आहे, असा प्रश्न आता सर्वांनाच सतावत आहे.

लखे कुटुंबातील बजरंग रमेश लखे (२२) आणि उमेश रमेश लखे (२५) या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. काही वेळाने ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान, या घटनेने आणखी भयावह वळण घेतलं. त्याच कुटुंबातील वडील रमेश होनाजी लखे (५१) आणि आई राधाबाई रमेश लखे (४४) हे दोघेही त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आले. एकाच वेळी घडलेल्या या चार मृत्यूंमुळे संपूर्ण जवळा गावात खळबळ उडाली असून सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी पाहायला मिळाली.

विशेष म्हणजे मृत उमेश लखे हा मनसेचा मुदखेड तालुक्याचा माजी उपाध्यक्ष होता. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या उमेशच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळातही तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लखे कुटुंबाचा कोणाशी वाद होता का? आर्थिक अडचणी, कौटुंबिक तणाव किंवा इतर काही कारणांमुळे हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं का? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

पोलिसांनी घर आणि परिसर सील करून तपास सुरू केला असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी सुसाइड नोट आढळली आहे का, याबाबतही कसून चौकशी सुरू आहे. आत्महत्या की घातपात, या रहस्याचा उलगडा पोस्टमॉर्टेम अहवाल आणि सखोल तपासानंतरच होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

एकाच कुटुंबावर ओढावलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा सुन्न झाला असून, “नेमकं घडलं तरी काय?” हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे.