नवजात बाळांची तस्करी करणारी महिला टोळी पोलीसांनी केली जेरबंद.! सुप्रसिद्ध रुग्णालयातील नर्सचा सहभाग...

नवजात बाळांची तस्करी करणारी महिला टोळी पोलीसांनी केली जेरबंद.! सुप्रसिद्ध रुग्णालयातील नर्सचा सहभाग...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - आशिष ढगे पाटील, पुणे

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात नवजात अर्भकांची तस्करी (खरेदी- विक्री) केली जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर या प्रकरणी पोलीसांनी एकूण 6 महिला आरोपींना अटक केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात; पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटल मधील नर्सचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात नवजात बालकांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. काही महिला जगताप डेअरी या ठिकाणी नवजात बालक विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचला. त्यानुसार जगताप डेअरी परिसरात दोन रिक्षांमधून 6 महिला आल्या. पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या नवजात बालकाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता; त्या महिलांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यांचे मोबाईल तपासले असता त्यांनी संबंधित बाळ विकणार असल्याचे संभाषण पोलिसांच्या तपासात समोर आले.

पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता; या महिला संबंधित बालकाला पाच लाख रुपयांना विकणार असल्याचे त्यांनी कबूल केले. महिलांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे याआधी देखील या महिला आरोपींनी पाच नवजात बालक विकल्याचं पोलीस चौकशीत उघड झाल आहे. महिला आरोपींमध्ये एक परिचारिका असून ती खाजगी रुग्णालयात काम करते. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालकांना हेरून परिचारिका त्यांना पैशाचं अमिश दाखवून नवजात बालक विकत घ्यायची. तेच बालक तिच्या टोळीच्या मदतीने इतर मुल- बाळ नसलेल्या पालकांना विकून त्यांच्याकडून पाच ते सात लाख रुपये घ्यायची. अखेर बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.