राजकीय : नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परीषद गटात एका परिचय पत्राची चर्चा, पक्षाच्या नेत्यांकडून तातडीने स्पष्टीकरण...!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार जीवन खराबी यांनी स्वतःच्या परिचय पत्रात उबाठा पक्षाची मशाल आणि नेत्यांचे फोटो टाकून परिचय पत्र बनवल्याने गटात उलट सुलट चर्चांना पेव फुटले आहे. या संदर्भात पक्षाच्या नेत्यांनी तातडीने स्पष्टीकरण देऊन अजून कुणालाही तिकीट अथवा तसा कोणताही शब्द दिला नसल्याचे सांगितले आहे.

नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीकडून त्यात उबाठा पक्षाकडून बरेच इच्छुक उमेदवार आहेत. त्यात पक्षाचे नेते अमोल पवार,गणेश नाणेकर आणि २०२४ ला पक्षाला बाजूला ठेऊन सर्व पक्षीय उमेदवार म्हणून आमदार बाबाजी काळे यांचे काम केलेले भाजपा नेते संदीप सोमवंशी हे प्रामुख्याने इच्छुक आहेत. त्यात मागील काही दिवसापासून खराबवाडी गावचे माजी सरपंच जीवन खराबी हेही उबाठा पक्षाच्या चिन्हावर आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच त्यांनी अजूनही उबाठा पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही. पण त्यांनी त्यांच्या परिचय पत्रात थेट उबाठा पक्षाची मशाल आणि वरिष्ठ नेत्यांचे फोटो टाकल्याने जिल्हा परिषद गटात मोठा संभ्रम निर्माण झाला. यामुळे उबाठा पक्षाकडून इच्छुक असणारे शिवसेना नेते अमोल पवार यांचाही फोटो त्यावर असल्याने अजूनच वेगळी चर्चा गटात सुरु झाली. यावर अमोल पवार यांनी तातडीने माध्यमांशी संपर्क करून माझा फोटो असा टाकणे म्हणजे हा एक खोडसाळ पणा आहे. मी स्वतःच पक्षाकडून इच्छुक आहे. कुणाला आमच्या पक्षाकडून उमेदवारी मागायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आम्हाला याची कोणतीही कल्पना न देता थेट असे परिचय पत्र छापणे किंवा छापण्या बद्दल आक्षेप नाही पण त्यावर मी इच्छुक असताना माझा फोटो छापणे हे खोडसाळ पणाचे लक्षण आहे. या संदर्भात अमोल पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून हे थांबविण्याची विनंती केली आहे.
यावर पक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड यांनी सांगितले कि,आमच्या पक्षाची उमेदवारी देण्याची प्रक्रिया वेगळी असते.त्यात अगोदर मुलाखती,मेरीट आणि त्यानंतर पक्षीय संघटनेत चर्चा होऊन आमचा उमेदवार ठरवला जातो. त्यामुळे जे परिचय पत्र तयार केले याची कोणतीही कल्पना मला नाही आहे. यानंतर तालुका प्रमुख रामदास धनवटे यांना संपर्क केला असता ते आमच्या पक्षाकडून इच्छुक आहेत पण,अजून निवडणूकचं जाहीर झाली नाही त्यामुळे उमेदवार जाहीर करणे प्रश्नच नाही. पण खराबी यांनी असे परिचय पत्र छापले या बद्दल आम्हाला माहिती नाही त्या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर याच जिल्हा परिषद गटातील शिवसेना नेते शिवाजी वर्पे यांनीही हे चुकीचे आहे अशी कोणतीही कल्पना परिचय पत्र छापताना त्यांनी आम्हाला दिली नाही. त्यांच्या बरोबर आमचे नेते अमोल पवार हे बोलले आहेत आणि मीही त्यांच्याशी बोलून हे योग्य नाही आणि ते तातडीने थांबवा ज्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होणार नाही अशी ताकीद देणार आहे. यावर जीवन खराबी यांनीही हे आहे असेच थांबवतो असे परिचय पत्र कुठेही वाटले जाणार नाही असे वरील नेत्यांना कळवले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. आता यावर यातील असे करविता धनी कोण? याचा शोध लवकरच लावला जाईल असे सुतोवाच शिवसेना नेते आणि इच्छुक उमेदवार अमोल पवार यांनी केले आहे.
या सर्व घडामोडीवर आमदार बाबाजी काळे यांनी तातडीने जीवन खराबी यांना बोलून घेऊन समज देणार असल्याचीही खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घडामोडीवर पुढील राजकीय गणिते कसे बदलतात हेच पहावे लागेल.