राजकीय : जीवन खराबी यांच्या उमेदवारीवर हायकोर्टात 'टांगती तलवार'; १०० कोटींची संपत्ती, पण सरकारी जागेवर अतिक्रमनाचा आरोप?

राजकीय : जीवन खराबी यांच्या उमेदवारीवर हायकोर्टात 'टांगती तलवार'; १०० कोटींची संपत्ती, पण सरकारी जागेवर अतिक्रमनाचा आरोप?

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

खराबवाडी/चाकण: नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटातील राजकारण आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार जीवन खराबी यांच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, २७ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

निवडणूक अर्ज छाननीवेळी तक्रारदार मंगेश दिनकर सातव यांनी खराबी यांच्या उमेदवारीवर गंभीर हरकत घेतली होती. खराबी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात मिळकत नंबर २१८ (०१६१) ची माहिती लपवल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही मिळकत चक्क गायरान (सरकारी) जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

प्रशासकीय निर्णयावर प्रश्नचिन्ह..

खेड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीचा अहवाल मागवून खराबी यांचा अर्ज वैध ठरवला होता. मात्र, "शपथपत्रातील माहितीची सत्यता पडताळण्याचे अधिकार आम्हाला नाहीत," असे हतबलता दर्शवणारे विधान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात केल्याने संभ्रम वाढला आहे. याच निर्णयाला आता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

१०० कोटींचे मालक अन् सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप?

जीवन खराबी यांनी आपल्या शपथपत्रात १०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे. इतकी अफाट संपत्ती असतानाही, सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप होत असल्याने परिसरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

तक्रारदाराचे गंभीर मुद्दे आणि न्यायालयापुढील आव्हाने:

 * बक्षीस पत्राचा बनाव? सदर अतिक्रमित जागा उमेदवाराच्या वडिलांनी नातवांच्या नावे 'बक्षीस पत्र' करून दिल्या माहिती समोर येत आहे. सरकारी जागेचे बक्षीस पत्र नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे कसे होऊ शकते? हा मोठा प्रश्न आहे.

* अधिकारी अडचणीत येणार? जर ही जागा सरकारी असेल, तर त्याचे बक्षीस पत्र करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि उमेदवारावर फौजदारी कारवाई होणार का?

* पंचनाम्याची टांगती तलवार: उच्च न्यायालयाने खराबवाडी ग्रामपंचायतीकडून सध्याच्या स्थितीचा पंचनामा मागवल्यास, अतिक्रमणाचे बिंग फुटण्याची दाट शक्यता आहे.

महत्त्वाची तारीख: २७ जानेवारी २०२६ रोजी उच्च न्यायालय यावर अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने हे अतिक्रमण ग्राह्य धरले, तर जीवन खराबी यांची उमेदवारी रद्द होऊन उबाठा पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.