विशेष वृत्तांत: लोकशाहीचा लिलाव की विकासाचा अंत? निवडणुकीच्या बाजारात 'निष्ठे'चा बळी..!
पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे, मात्र या उत्सवात 'लोकशाही' कुठेच दिसत नाहीये. दिसतोय तो फक्त नोटांचा पाऊस, सत्तेची हापापलेली वृत्ती आणि विकासाऐवजी 'विकाऊ' मानसिकतेचे प्रदर्शन. पुणे जिल्ह्यासारख्या सधन पट्ट्यात तर आता राजकारण राहिलेले नसून तो एक शुद्ध आर्थिक व्यवहार झाला आहे, अशी संतप्त भावना स्थानिक राजकीय विश्लेषक यांनी व्यक्त केली आहे.
पैशांच्या पाकिटात बंद झालेली तत्त्वे..
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत 'निष्ठा' हा शब्द डिक्शनरीतून गायब झाला आहे. आर्थिक तडजोडी करून तिकीट मिळवायचे आणि मग खिशातील नोटांच्या जोरावर 'भाडोत्री' कार्यकर्ते उभे करायचे, असा नवा पायंडा पडला आहे. हे पेड कार्यकर्ते ढोल-ताशे वाजवून उमेदवाराचे स्वागत करतात, खुर्च्या मांडतात आणि मतदारांच्या ताटात ओवाळणीच्या नावाखाली लोकशाहीचा लिलाव करतात. उमेदवाराचे ते 'बळजबरीचे हसणे' आणि मतदारांची 'हपापलेली वृत्ती' पाहून लोकशाही आज खरोखरच लाजली आहे.
मतदार राजा की 'भिकारी'?
सर्वात खेदजनक बाब म्हणजे मतदारांची मानसिकता. "कोणता उमेदवार आपल्याला पैसे देईल आणि कोण भाऊ-दादा म्हणेल," याच आशेने आजचा मतदार डोळ्यावर कातडे ओढून बसला आहे. आपल्या मुलांचे भवितव्य, बेरोजगारी, रोजच्या गरजा आणि गावाचा विकास यापेक्षा एका रात्रीची 'पाकीट संस्कृती' मतदारांना मोठी वाटू लागली आहे. मतदारांची याच लाचारीमुळे भ्रष्ट उमेदवारांचे फावते आहे.
मतदान हा लोकशाहीचा पवित्र उत्सव असायला हवा, पण दुर्दैवाने तो आज केवळ आर्थिक तडजोडींचा 'बाजार' बनला आहे. जिथे मतदारांची बोली लावली जाते, तिथे विकासाची अपेक्षा करणे हा मूर्खपणा आहे.
— राजकीय विश्लेषक
आर्थिक सुबत्ता विरुद्ध बौद्धिक दारिद्र्य..
पुणे जिल्ह्यातील सधन तालुक्यांमध्ये पैशाचा वणवा इतका पेटला आहे की, प्रामाणिक आणि सुशिक्षित उमेदवार राजकारणातून बाहेर फेकले जात आहेत. ज्यांच्याकडे फक्त पैसा आहे पण ना व्हिजन आहे ना विकासाची धमक, असे 'अनपड' लोक सत्तेवर बसत आहेत. याचा परिणाम म्हणून:
* विकासाचा बोजवारा: पैसा देऊन निवडून आलेला उमेदवार आधी स्वतःची गुंतवणूक वसूल करतो, मगच लोकांकडे पाहतो.
* सामाजिक समस्या: गावपातळीवर गुन्हेगारी, व्यसनाधीनता आणि बेरोजगारीने अजगरासारखा विळखा घातला आहे.
* खोटा दिखावा: आश्वासनपूर्ती शून्य आणि केवळ प्रसिद्धीचा झगमगाट..!
वेळ अजूनही गेली नाही..!
जर मतदारांनी आताच स्वतःला सावरले नाही, तर लोकशाहीचा अंत अटळ आहे. आर्थिक प्रलोभने झुगारून, जो उमेदवार उच्चशिक्षित आहे, ज्याच्याकडे विकासाचा आराखडा आहे आणि ज्याच्यात निधी खेचून आणण्याची धमक आहे, अशाच माणसाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. अन्यथा, आज घेतलेले दोन-पाच हजार रुपये उद्या तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधारात ढकलतील, हे निश्चित.
शब्दांकन : श्री. आशिष ढगे पाटील, पत्रकार