'जल अर्पण' सोहळ्याने शेगाव दुमदुमले; तिर्री शेगाव येथील ग्रामस्थांचा उत्साही सहभाग...
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
गट ग्रामपंचायत तिर्री अंतर्गत येणाऱ्या शेगाव येथे 'जल अर्पण दिवस' अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावाच्या पाणीपुरवठा योजनेचे महत्त्व आणि जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या सोहळ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात जलपूजनाने करण्यात आली. याप्रसंगी गावात विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. पाण्याचे महत्त्व आणि स्वच्छतेबाबत यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले होते.
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमानंतर सायंकाळी संपूर्ण ग्रामस्थांसाठी 'स्नेहभोजनाचे' आयोजन करण्यात आले होते. 'एक गाव, एक पंगत' या भावनेतून सर्व स्तरांतील नागरिक या भोजनात सहभागी झाले, ज्यामुळे गावातील सामाजिक एकोपा अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाला पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ, युवक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. अतिशय शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात हा 'जल अर्पण' सोहळा संपन्न झाला.
