अठरा वर्षीय तरुणाची अमानुषपणे हत्या.! शरीराचे अनेक तुकडे करून फेकले वेगवेगळ्या विहिरीत...

अठरा वर्षीय तरुणाची अमानुषपणे हत्या.! शरीराचे अनेक तुकडे करून फेकले वेगवेगळ्या विहिरीत...

पुणे शहर असो की पुणे जिल्हा मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमुळे वारंवार चर्चेत येत आहे. हत्या, बलात्कार, लूटमार, दरोडा, छेडछाडी यासह अनेक गंभीर गुन्हे या पुणे शहर आणि जिल्ह्यात घडताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा लावणारी घटना समोर आली आहे. एका अठरा वर्षीय तरुणाची अमानुषपणे हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे चक्क वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणाचे हात, पाय, शीर, धड वेगवेगळ्या विहिरींमध्ये सापडल्याने पोलिसांसमोर गुन्ह्याचे मोठे कोडे उभे राहिलेय.

सदर धक्कादायक घटना पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे घडली. दि. 6 मार्च रोजी माऊली गव्हाणे हा 18 वर्षीय तरुण बारावीच्या परीक्षेसाठी शिरूर येथे गेला होता. मात्र, त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर आठ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. दाणेवाडी गावातील एका विहिरीत दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा धड सापडला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता.! आज गावातील दुसऱ्या एका विहिरीत त्याचे शीर आणि हात-पाय सापडले. पोलिसांनी या शरीराच्या तुकड्यांची ओळख पटवली असता; तो बेपत्ता झालेला माऊली गव्हाणे असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. एवढ्या अमानुषपणे हत्या करण्यात आली.! यामागे कारण काय? हत्येचा मुख्य सुत्रधार कोण? याचा शोध घेतला जात असून, पोलिसांकडून या प्रकरणी शक्य तितक्या दिशांनी तपास केला जात आहे. तर लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा अंदाज वर्तवला जातोय.

या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसत आहे. एका विद्यार्थ्याची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाल्याने पालकांमध्ये देखील चिंता वाढली आहे. घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.