शिवाजीराव गायकवाड यांना राज्यस्तरीय “शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” प्रदान.! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान...

शिवाजीराव गायकवाड यांना राज्यस्तरीय “शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” प्रदान.! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपुर येथे पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीतच उल्लेखनीय कार्य करत समाजातील वंचित, उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना आवाज देणारे ‘आवाज बहुजनांचा न्यूज चॅनल’ चे संपादक पत्रकार शिवाजीराव रामराव गायकवाड यांना “शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025” ने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे 5 नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय सेवा संघटनेच्या भव्य मेळाव्यात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील, शिवा संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख तथा सेवा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, आमदार अर्चनाताई पाटील-चाकूरकर, तसेच अनेक संत-महंत, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

शिवा संघटनेच्या वतीने मागील 30 वर्षांपासून कार्तिकी पौर्णिमेनिमित्त कपिलधार येथे राज्यस्तरीय सेवा मेळावा घेण्यात येतो. या मेळाव्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्याची परंपरा आहे. त्या परंपरेचा सन्मान राखत यंदाच्या पत्रकारिता पुरस्कारासाठी अहमदपूर तालुक्यातील समाजप्रबोधन करणारे आणि निष्पक्ष वृत्तांकनासाठी ओळखले जाणारे पत्रकार शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी शिवानंदतात्या हेंगणे, माजी नगरसेवक अभय मिरकले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.शिवाजीराव गायकवाड यांनी अल्पावधीतच आपल्या पत्रकारितेतून ग्रामीण भागातील खऱ्या समस्या मांडत सामाजिक परिवर्तनाचा दीप प्रज्वलित केला आहे. त्यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि जनतेच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या वृत्तांकनामुळेच त्यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

“हा सन्मान माझ्या वैयक्तिक कार्याचा नाही, तर समाजातील त्या प्रत्येक वंचित, शोषित आवाजाचा सन्मान आहे, ज्यांच्यासाठी मी   माझ पत्रकारितेचं हत्यार  उचलतो. पत्रकारिता ही केवळ बातमी देणं नाही, तर समाजात प्रकाश पाडण्याचं साधन आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे आणि मी ती अधिक प्रामाणिकपणे पार पाडेन.”

पुरस्कारप्राप्तीनंतर त्यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत असून विविध पत्रकार संघटना, सामाजिक संस्था, राजकीय नेते, वाचकवर्ग आणि स्थानिक जनतेकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.